करचुकवेगिरी करणाऱ्या 30 हून अधिक खासगी बसेस जप्त
राज्य परिवहन खात्याच्या विशेष कृती दलाची कारवाई
बेंगळूर : वेगवेगळ्या राज्यांत नोंदणी करून करचुकवून राज्यात संचार करत असलेल्या 30 हून अधिक खासगी बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन खात्याच्या विशेष कृती दलाने ही कारवाई केली आहे. नागालँड, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पॉन्डिचेरीसह विविध राज्यांमध्ये नोंदणी करून कर न भरता राज्यात संचार करणाऱ्या अनेक खासगी बसेसचा परिवहन खात्याने शोध घेतला आहे. कर न भरता फसवणूक करण्यात येत असल्याचे तपासातून समोर आले आहे. 2023 च्या अखिल भारतीय वाहतूक परवाना नियमांनुसार कोणतीही वाहने विशेषत: व्यावसायिक वापरासाठीच्या खासगी बसेसची नोंदणी केली तर 90 हजार रुपये शुल्क भरावे लागते. हे केवळ नोंदणी शुल्क असून कर म्हणून ग्राह्या धरले जात नाही.
कोणत्याही राज्यात खासगी बसेस संचार करत असल्या तरी त्यांना त्या राज्यासाठी परिवहन विभागाने निश्चित केलेला कर भरावा लागतो. मात्र, अनेक ट्रॅव्हल एजन्सी कर भरणा न करता परराज्यात नोंदणीवेळी भरलेल्या शुल्काची पावती दाखवून कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. अशा बसेससंबंधी राज्य परिवहन खात्याच्या विशेष कृतीदलाने माहिती जमा करून 30 हून अधिक खासगी बसेस जप्त केल्या आहेत. कर भरल्यानंतर या बसेस संबंधित ट्रॅव्हल एजन्सींना परत केल्या जातील, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. करचुकवेगिरी करणाऱ्या खासगी बसेस वाटेतच अडवून त्यातील प्रवाशांना बीएमटीसीच्या बसेसमधून पुढील प्रवासासाठी अनुकूल करून देण्यात आले. त्यामुळे जप्त केलेल्या बसमधील कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती.