वर्षभरात 30 लाखांहून अधिक लोकांना कुत्र्यांचा चावा
सरकारने संसदेत दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 मध्ये कुत्रा चावण्याच्या जवळपास 30.5 लाख घटना घडल्याची नोंद झाली आहे. या घटनांमुळे 286 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात यासंबंधीची माहिती दिली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रम (आयडीएसपी) मध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये कुत्रा चावण्याची एकूण 30 लाख 43 हजार 339 प्रकरणे नोंदवली गेली. या कालावधीत 286 जणांना कुत्रा चावल्याने प्र्राण गमवावे लागले.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 2023 या वर्षात अँटी-रेबीज लसींची संख्या 46 लाख 54 हजार 398 होती. आरोग्य मंत्रालय 12व्या पंचवार्षिक योजनेपासून देशातील रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम राबवत आहे. याशिवाय, कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या संख्येचे व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे काम असल्याचेही सिंह यांनी म्हटले आहे. या संदर्भात अनेक स्थानिक संस्था प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण राबवत आहेत. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 तयार केले आहेत. पशु रोग नियंत्रणासाठी केंद्र सरकार राज्याच्या मदतीअंतर्गत निधीही देत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार हा निधी रेबीज लसीकरणासाठी वापरू शकते. सरकारकडून इतके प्रयत्न सुरू असतानाही या घटनांमध्ये होणारी मृत्यूनोंद आश्चर्यकारक आहे.