मधमाशांच्या हल्ल्यात 23 हून अधिक विद्यार्थी जखमी
शिरसी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमधील घटना
कारवार : मधमाशांच्या हल्ल्यात 23 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शिरसी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये बुधवारी घडली. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी डॉन बॉस्को हायस्कूलचे विद्यार्थी शाळेच्या पाठीमागे खेळत होते. त्यावेळी कुठूनतरी दाखल झालेल्या मधमाशांनी विद्यार्थ्यांच्यावर हल्ला चढविला. मधमाशांनी चढविलेल्या हल्ल्याच्या वेदना सहन न झाल्याने विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गखोल्या गाठल्या. तरीसुद्धा मधमाशांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग सोडला नाही. वर्गखोल्यामध्ये प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आतून कडी लावून घेतल्यामुळे आणि अन्य काही विद्यार्थी वर्गामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे काहीकाळ विद्यार्थीवर्गात गोंधळ निर्माण झाला होता. मधमाशांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या फादर संदीप आणि शिक्षकांनाही मधमाशांनी सोडले नाही. तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून विद्यार्थ्यांना शिरसी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा अपवाद वगळता अन्य विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. शिरसी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रत्नाकरी यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची पाहणी केली.