हवा प्रदूषणामुळे देशात एका वर्षाला २० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू
देशात हवाप्रदूषणाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणामामुळे दरवर्षी २० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे. ‘बीएमजे’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. हवाप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे, या दोन्ही देशांतील हवाप्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे.
जर्मनीतील मॅक्स प्लांक रसायनशास्त्र संस्थेतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. जीवाश्म इंधनाशी संबंधित हवाप्रदूषणामुळे होणारे मृत्यू तपासण्यासाठी नवीन मॉडेल वापरण्यात आले. जीवाश्म इंधनाऐवजी स्वच्छ, अपारंपरिक ऊर्जा वापरण्याच्या धोरणांमुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांचेही मूल्यांकन करण्यात आले. लोकसंख्येची आकडेवारी, नासाच्या उपग्रहाने टिपलेले सूक्ष्म कण, वातावरणीय रसायनशास्त्र, एरोसोल आदींच्या आधारे चार परिस्थितींची कल्पना करून हे संशोधन करण्यात आले.