For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

17 हून अधिक रुग्ण जुलाबाने अत्यवस्थ

06:58 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
17 हून अधिक रुग्ण जुलाबाने अत्यवस्थ
Advertisement

दूषित पाण्यामुळे प्रकृती बिघडली : वेळीच उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे दूषित पाण्यामुळे जुलाब होण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. अलीकडेच जुलाबामुळे एकाचवेळी 17 हून अधिक रुग्ण डॉ. अमित भाते यांच्या दवाखान्यात दाखल झाले होते. एकाच वाहनातून प्रवास करून आलेल्या या सर्वांनाच उलटी-जुलाबाने ग्रासले व त्यांची प्रकृती चिंताग्रस्त झाली. त्यापैकी एक वयोवृद्ध रुग्ण दगावला असला तरी अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

Advertisement

प्रवास करून आलेल्या या सर्वांना जुलाबामुळे त्रास होऊ लागला. जुलाब होण्याचे प्रमाण इतके वाढले की एका दिवसात एका रुग्णाला 60 ते 70 वेळा जुलाब झाले. परिणामी त्यांच्या शरीरातील क्रियाटीन कमी झाले व त्यापैकी एक-दोघा जणांना डायलिसिसवर ठेवावे लागले. तर काही रुग्णांना ‘टेम्पररी किडनी फेल्युअर’ला सामोरे जावे लागले.

अशा परिस्थितीत रुग्णांना सलाईन आणि औषधाद्वारे उपचार करून त्यांच्या किडनीला परत कार्यरत करावे लागले. दुर्दैवाने या रुग्णांपैकी एका वृद्ध रुग्णाची परिस्थिती गंभीर झाली. त्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. जुलाब किंवा ज्याला वैद्यकीय परिभाषेत डायेरिया म्हटले जाते, तो दूषित पाणी शरीरात गेल्याने होतो.

अलीकडे वर्षापर्यटनाची क्रेझ आली आहे. पर्यटनाच्या धुंदीत रस्त्यावर उघड्यावर विकले जाणारे पदार्थ, पाणी सेवन करणे स्वाभाविकपणे होते. यावेळी काळजी घेण्याचे भानही रहात नाही. परिणामी त्याचे दुष्परिणाम कालांतराने समोर येतात आणि शारीरिक नुकसानही होऊ शकते.

याबाबत डॉ. अमित भाते यांच्याशी संपर्क करता त्यांनी रुग्ण अतिशय गंभीर परिस्थितीत दाखल झाले होते. 60 ते 70 वेळा जुलाब झाल्यानंतर कोणत्याही रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होते. त्याचा परिणाम ‘टेम्पररी किडनी फेल’ होण्यामध्ये होतो. वैद्यकीय उपचारांनी किडनी रिस्टार्ट करावी लागते, असे ते म्हणाले.

बाहेरील उघड्यावरील पदार्थ, स्ट्रीट फूडबाबत तसेच बाहेर दिल्या जाणाऱ्या पाण्याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. किमान पावसाळ्यामध्ये तरी याचे भान ठेवणे आवश्यक आहे असे सांगून कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. केवळ पाण्याने व साबणाने हात धुवून चालणार नाही तर हात धुण्याचे जे तंत्र आहे ते आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

साबणाने किमान एक मिनिट हात धुणे आवश्यक : डॉ अमित भाते

साबणाने किमान एक मिनिट हात धुणे आवश्यक आहे. तळव्याच्या मागील व पुढील बाजू, नखे आणि पूर्ण तळवा अशा पद्धतीने हात धुवायला हवा. फक्त पाण्याने हात धुवून भागणार नाही. डायेरिया किंवा जुलाब वाढण्यामागे जसे दुषित पाणी कारणीभूत आहे तसेच हात योग्य पद्धतीने न धुणे हे सुद्धा कारण आहे, असे डॉ. भाते यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.