For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एप्रिलमध्ये 15 कोटींहून अधिक कर जमा

11:09 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
एप्रिलमध्ये 15 कोटींहून अधिक कर जमा
Advertisement

महानगरपालिकेकडे 5 टक्के सवलतीला मुदतवाढीची मागणी : आणखी महिनाभर सवलत मिळणार का?

Advertisement

बेळगाव : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात जर घरपट्टी भरली तर 5 टक्के सवलत दिली जाते. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी बेळगावच्या जनतेने पहिल्या महिन्यातच 15 कोटी 50 लाख रुपयांची घरपट्टी भरली आहे. सर्व्हरडाऊन, चलन वेळेत न मिळणे, असे प्रकार घडूनही इतक्या प्रमाणात घरपट्टी बेळगावकरांनी भरली आहे. यामध्ये आणखी निश्चितच वाढ झाली असती. विविध समस्यांमुळे काही जणांनी घरपट्टी भरण्याचे टाळले आहे. महानगरपालिका दरवर्षी एप्रिल महिन्यापासून नव्याने घरपट्टी भरण्यास सुरुवात करते. एप्रिलमध्ये पाच टक्के सवलत दिली जाते. सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे कर्मचारीही त्या कामामध्ये गुंतले आहेत. याचबरोबर वाढलेला उष्मा आणि महानगरपालिकेकडून घरपट्टी भरताना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने घरपट्टी कमी जमा झाली आहे. जर व्यवस्थित सर्व्हर व चलन मिळाले असते तर आणखी किमान 10 कोटीहून अधिक घरपट्टी जमा झाली असती, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी घरपट्टी भरण्यासाठी आवाहन केल्यानंतर तातडीने महानगरपालिकेने सर्व्हरची समस्या दूर करणे गरजेचे होते. मात्र अर्धा महिना उलटला तरी सर्व्हरची समस्या सुटली नव्हती. चलनद्वारेच मोठ्या प्रमाणात घरपट्टी जमा झाली. ऑनलाईन तसेच सदनिकांची घरपट्टी जमा करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यामुळे जनतेने घरपट्टी भरण्याचे टाळले आहे. मे महिन्यामध्ये सवलत दिली जात नाही. मात्र या महिन्यात घरपट्टी भरल्यास दंड आकारला जात नाही. जूननंतर  दंड आकारला जातो. त्यामुळे मे महिन्यात घरपट्टी अधिक जमा होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांतून चलन घेण्यासाठी घर मालकांनी सकाळीच रांगेत उभे राहून चलन घेतले. याचबरोबर बेळगाव वनमधूनही चलनद्वारे घरपट्टी भरली. दोन्ही ठिकाणी धावपळ करताना साऱ्यांनाच कसरत करावी लागली. उन्हाच्या झळा आणि लांबच्यालांब रांगा यामुळे जनता अक्षरश: मेटाकुटीला आली होती. तरीदेखील 15 कोटीहून अधिक रुपयांचा कर महानगरपालिकेकडे जमा झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.