गणेशोत्सवात 1100 हून अधिक मोबाईल चोरट्यांकडून लंपास
पुणे / वार्ताहर :
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनोख्या स्वरूपात मोठय़ा जल्लोषात साजरी केली जाते. मात्र, त्याचा गैरफायदा घेत चोरटय़ांनी अनेकांचे मोबाईल चोरी करत लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर आणि गणेशोत्सवात विविध गणेश मंडळ परिसरात गर्दीच्या ठिकाणी 1100 हून अधिक मोबाईल चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
गणेशोत्सवात भाविकांच्या खिशातील रोकड, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या घटना दरवर्षी मोठय़ा प्रमाणात घडत असतात. पुण्यातील विसर्जन सोहळा राज्यभरातील आणि देशातील भाविकांचे आकर्षण आहे. गुरुवारी दिवसभर आणि मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात मुख्य विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हजार पेक्षा अधिक मोबाईल चोरटय़ांनी चोरले आहेत. यंदा गणेशोत्सवात मोबाईल चोरीला गेल्याच्या 1100 पेक्षा जास्त तक्रारी पुणे पोलिसांच्या 'लॉस्ट अँड फाऊंड' या ऑनलाईन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत. विश्रामबाग, खडक, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. नुकतेच हडपसर पोलिसांनी नागरिकांचे मोबाईल चोरणाऱया झारखंडमधील चोरटय़ांच्या दोन टोळ्या जेरबंद करून त्यांच्याकडून 105 मोबाईल जप्त केले आहेत.