सुदानमध्ये भूस्खलनात 1 हजारहून अधिक मृत्यू
दारफूर प्रांतातील संपूर्ण गाव उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ कैरो
सुदानच्या पश्चिमेकडील दारफूर प्रांतात भूस्खलनामुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या देशावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी’ या बंडखोर गटाने मंगळवारी यासंबंधीची माहिती दिली. गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर रविवारी तारासीन गावात भूस्खलन झाले. या आपत्तीमध्ये येथे प्रचंड जीवितहानी झाली आहे. तारासीन हे गाव मध्य दारफूरच्या माराह पर्वतांच्या मध्यभागी आहे. ही अलिकडच्या काळातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती समजली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तारासीन गावात राहणारे जवळजवळ सर्व लोक मृत्युमुखी पडले आहेत. फक्त एक व्यक्ती वाचली आहे. अंदाजे एक हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असल्याचे सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मीने सांगितले. मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी आणि ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत गटांना आवाहन केले आहे. स्थानिक माध्यमांनी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये पर्वतांमधील संपूर्ण परिसर जमीनदोस्त झाल्याचे दिसत आहे. विविध बचाव पथके आणि काही लोक तेथे ढिगाऱ्यात शोधमोहीम राबवताना निदर्शनास येत आहे.