नायजेरियात बोको हरामकडून 100 हून अधिक जणांची हत्या
वृत्तसंस्था/मैदुगुरी
नायजेरियात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला करत 100 हून अधिक जणांना ठार केले आहे. दहशतवाद्यांनी बाजार, सामूहिक प्रार्थना करणाऱ्या लोकांवर आणि घरांमध्ये गोळीबार केल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. 50 हून अधिक दहशतवादी मोटरसायकल्सवरून योबे प्रांताच्या तारमुवा परिषद क्षेत्रात शिरले आणि त्यांनी इमारतींना आग लावण्यापूर्वी बेछूट गोळीबार केल्याची माहिती योबे पोलीस विभागाचे प्रवक्ते डुंगस अब्दुल करीम यांनी दिली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 104 हून अधिक ग्रामस्थ मारले गेल्याचा दावा समुदायाचे नेते जना उमर यांनी केला आहे. बहुतांश लोकांना प्रशासकीय अधिकारी पोहोचण्यापूर्वीच दफन करण्यात आले होते किंवा त्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी हलविण्यात आले होते असेही जना उमर यांनी म्हटले आहे. नायजेरियात बोको हराम या दहशतवाद्यांनी एका भागावर स्वत:चे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.