राज्यात पावसापेक्षा वादळी वारे अधिक
अकेक ठिकाणी वृक्ष कोसळले : घरांची, वीज खात्याची नुकसानी
पणजी : गोव्यात पावसापेक्षा जोरदार वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. गेल्या 24 तासात राज्यात सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमात आतापर्यंत 26 इंच पावसाची नोंद झाली. गोव्यात सर्वत्र मध्यम तथा जोरदार पाऊस कोसळला. उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात जादा पाऊस पडला. मंगळवारी राज्यात यलो अर्लट होते. तथापि दक्षिण गोव्यासाठी ऑरेंज अर्लट जारी करण्यात आले. उत्तर गोव्यात 1 इंच तर दक्षिण गोव्यात पावणे दोन इंच पाऊस पडला. एकंदरीत सरासरी गोव्यात दीड इंच पाऊस पडला. केवळ 5 टक्के पाऊस यंदा कमी झालेला आहे. मोसमपूर्व पावसाची 30 इंच नोंद झालेली होती. दोन्ही एकत्रित केल्यास 56 इंच पाऊस पडला. दि. 30 जूनपर्यंत गोव्यात यलो अलर्ट असून या काळात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने सायंकाळी दिला. त्याचबरोबर समुद्र खवळलेला राहिल आणि लाटा 4 मीटर पेक्षाही जास्त उंची गाठू शकतील. वादळी वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 60 कि. मी. राहिल. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
धारबांदोडा आघाडीवर, 3 इंच नोंद
दरम्यान, यंदा नव्यानेच स्थापन केलेल्या धारबांदोडा केंद्रामध्ये गोव्यातील सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे. गेल्या 24 तासात तिथे 3 इंच पाऊस पडला. वाळपईत सुमारे 2 इंच, सांगे पावणे दोन इंच, फोंडा, केपे प्रत्येकी पावणेदोन इंच, सांखळी दीड इंच, दाबोळी दीड इंच, काणकोण दीड इंच, जुने गोवे 1 इंच, पणजी व मडगाव येथे प्रत्येकी 1 इंच व मुरगाव आणि पेडणे येथे प्रत्येकी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 1 सें. मी. पेक्षाही कमी पावसाची नोंद झालेली आहे.