कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चर्चा फिस्कटल्यास भारतावर अधिक कर

07:00 AM Aug 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी अमेरिकेची भारताला धमकी : आज अलास्कामध्ये आमने-सामने

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेने पुन्हा एकदा भारताला कर वाढवण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आज 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेट होणार आहे. या भेटीत युक्रेन-रशिया युद्ध रोखण्यावर चर्चा होणार असून या चर्चेत पुतिन यांनी झुकते माप घेतले नाही तर तर आम्ही भारतावर कर वाढवू, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी भारतावर दुय्यम कर वाढवण्याबद्दल भाष्य केले आहे. अलास्कामध्ये शुक्रवारी होणाऱ्या ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील बैठकीच्या निकालांवर आयात शुल्काबाबतचा निर्णय अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बेझंट म्हणाले की, ‘आम्ही रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर दुय्यम कर लादले आहेत. मला वाटते की जर परिस्थिती सुधारली नाही तर निर्बंध किंवा कर आणखी वाढू शकतात.’ डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला भारतावर एकूण 50 टक्के कर लादला. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर लादला आहे. भारतावर कर लावल्याने रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि पुतिन यांच्यावर दबाव वाढेल, असे अमेरिकेला वाटत आहे. मात्र, सद्यस्थितीत भारताने अधिकारी पातळीवरील बोलणी सुरू ठेवताना व्यापार कराराबाबत ‘वेट अँड वॉच’चे धोरण स्वीकारलेले दिसत आहे.

आज होणार बैठक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी भेट होणार आहे. यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील महत्त्वाच्या बैठकीकडे जगाचे लक्ष आहे. तथापि, अमेरिकन नेत्यांकडूनही वेगवेगळी विधाने येत आहेत.

अमेरिकेकडून दबावतंत्र

अलास्कामध्ये पुतिन यांच्याशी होणाऱ्या भेटीपूर्वी ट्रम्प युद्धबंदीसाठी रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असे तज्ञांचे मत आहे. जर रशिया युक्रेनसोबत युद्धबंदीसाठी सहमत झाला नाही तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्या अर्थमंत्र्यांनी भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे.

चर्चेकडे जगाचे लक्ष

डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची समोरासमोर भेट झाल्यानंतरही ते युक्रेनशी युद्धबंदीसाठी त्यांना राजी करण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील जमिनीच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख केला आहे. पुतिन यांची मागणी मान्य करून ट्रम्प युक्रेनच्या मोठ्या भागावर रशियाचा दावा मान्य करू शकतात असे मानले जाते. याबाबत युरोप आणि युक्रेनच्या नेत्यांमध्येही अस्वस्थता आहे. तसेच या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

भारताची भूमिका

15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या बैठकीबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या कराराचे भारत स्वागत करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या बैठकीमुळे युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची आणि शांततेच्या शक्यतांचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा हा युद्धाचा काळ नाही असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळेच आता रशिया-अमेरिका चर्चेला भारत पाठिंबा देतो आणि या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यास तयार आहे, असे जयस्वाल म्हणाले.

हवाई हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव मांडणार

वृत्तानुसार, रशिया हवाई हल्ले थांबवण्याचा तात्पुरता प्रस्ताव देऊ शकतो. बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी गेल्या आठवड्यात पुतीन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान हा प्रस्ताव मांडला होता. जरी ही संपूर्ण युद्धबंदी नसली तरी दोन्ही बाजूंसाठी हा निर्णय दिलासादायक ठरू शकतो. सध्या रशियाने मे महिन्यापासून युक्रेनवर सर्वात मोठे हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये एकट्या कीवमध्ये 72 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्यांना घृणास्पद म्हटले होते. युक्रेन देखील रशियन तेल शुद्धीकरण कारखाने आणि डेपोंवर हल्ले करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article