कैफियत...
(उत्तरार्ध)
त्यांच्यातही आणि आमच्यातही असे दोन्ही प्रकार आहेतच. माणसं डोक्यावर ओझी घेऊन जगत असतात आणि आम्ही पाठीवर ओझी घेऊन जगतो एवढाच काय तो फरक. आम्ही दुसऱ्याचं भलं करत मरून जातो आणि माणसं स्वत:साठी कधी जगतच नाहीत. म्हणजे एकूण काय ते आमच्यासारखेच असतात. असो देवा तुम्ही सगळ्या देवांनी प्रत्येक प्राणी, पक्षी यांना स्वत:चं वाहन म्हणून स्वीकारले अन् फक्त आम्हालाच तेवढं तुम्ही नाकारलं. किती वाईट वाटलं आम्हाला तेव्हा. आम्हाला ना देव आहे ना धर्म, पण माणसाने आपल्या जाती धर्माचे गट करून देवांची वाटणी करून घेतली. काही देव मात्र आमच्याप्रमाणे तसेच राहिलेत. त्यांची कोणी पूजाही करत नाही किंवा देवळेही बांधत नाही. त्यांचा आणि आमचा विचार कर...... आणि कुणाचा तरी वाहन म्हणून आमची नेमणूक तरी कर. तेवढाच प्रवास भत्ता तरी मिळेल. काहीतरी आरक्षण किंवा संरक्षण तरी आम्हाला तुम्ही द्याच ......ज्या हिमालयात कोणताही प्राणी जाऊ शकत नाही तिथे आम्ही जातो तिथे आम्हाला खेचर म्हणतात एवढेच, पण आम्ही सेवा करतच असतो. आम्हाला कोणतेही पुरस्कार पद्मभूषण वगैरे मिळत नाहीत, नोकरीत बढती नाही, की पगार वाढ नाही, काम करून खायला सुद्धा मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्या मिलिटरीमधल्या कुत्र्यांना, घोड्यांना..देखील बढती असते, पगार वाढतो त्यांच्या खाण्यात उत्तम पदार्थ असतात, पण आम्हाला यातलं काहीच नाही..? काहीतरी विचार करा देवा ....आमचा सुद्धा बाजार भरतो आमच्या किमती ठरतात.... शिकलेल्या मुलांना देखील उत्तम पॅकेज मिळतातच की आमच्यात अन् त्यांच्यात तसा फारसा फरक नाही ते लोकांची ओझी वाहतात आम्ही पण लोकांचीच ओझी वाहतो पण आम्हाला मात्र तू चार पायाचा केलंस आणि त्यांना मात्र दोन पायांचं केलंस... इथे सुद्धा तू फरक केलासच... आमच्या नावाने कितीतरी म्हणी प्रसिद्ध आहेत, सुभाषिते देखील आहेत ...गाढवाला गुळाची चव काय ... पण ती माणसाला देखील लागू पडतात. फास्ट फूड खाताना कसले तरी बेचव, आंबवलेले अन्न खातात ... तेव्हासुद्धा त्यांच्याही बाबतीत असंच म्हणायला लागतं ना! अगदी आमच्याबरोबर देवांनासुद्धा काही म्हणींमध्ये घातले आहे...अडला हरी गाढवाचे पाय धरी... देवा हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की आमच्यासाठी तू काहीतरी करायला हवय...आम्हाला कुठलं ना कुठलं आरक्षण, नाहीतर संरक्षण तरी तू द्यायलाच हवं...... आता मात्र देवाने कपाळावर हात मारला. आधीच आरक्षणाचा इतका गोंधळ चाललाय आणि त्याच्यात गाढवांना कुठलं आरक्षण देणार? आणि आरक्षण दिलेली गाढवं नेमकं काय करणार? हेही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेतच.