जमिनीत दफन होता कोट्यावधी वर्षे जुना ‘दैत्य’
उत्खननातून आला समोर
स्पेनमध्ये माद्रिद-लेवांटे हायस्पीड रेल नेटवर्कसाठी रेल्वेमार्ग तयार केले जात असताना जमिनीत खोदकाम केले जात होते. याचदरम्यान तेथे काम करणाऱ्या कामगारांना अचानक मोठमोठी हाडं मिळू लागली. ही हाडं पाहून हे कामगार घाबरून गेले. एखादा दैत्य समोर आल्याचे त्यांना वाटत होते. परंतु त्यानंतर तेथे जीवाश्म तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तज्ञांनी तपासणी केल्यावर हे अवशेष 7.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात डायनासोरच्या एका नव्या प्रजातीचे असल्याचे सांगितले. याच्याशी संबंधित अहवाल आता कम्युनिकेशन्स बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
जीवाश्म वैज्ञानिकांना तेथून 12 हजारांहून अधिक जीवाश्म मिळाले आहेत. या सर्व जीवाश्मांची तपासणी करण्यात आली. काही जीवाश्म परस्परांशी जोडलेले होते. अशा स्थितीत वैज्ञानिकांनी जीवाश्मांना जोडण्यास सुरुवात केल्यावर एक कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर असलेल्या नव्या प्रजातीचा डायनासोर समोर आला. यामुळे अनेक अज्ञात प्रजातींची ओळख शक्य झाली आहे. तसेच क्रिटेशियस काळाच्या अखेरीस जीवन कसे होते हे जाणून घेण्यास संशोधकांना मदत झाली आहे. डायनासोरचा शोध घेणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे पोर्तुगाली जीवाश्मतज्ञ डॉक्टर पेड्रो मोचो यांनी स्पेनच्या कुएनकाच्या आसपास शोधण्यात आलेल्या नव्या सॉरोपॉडला क्यूकासौरा पिंटिक्विनिएस्ट्रा नाव दिले आहे.
या नमुन्याच्या अध्ययनातून आम्हाला पहिल्यांदाच एकाच जीवाश्म क्षेत्रात साल्टासौरोइड्सच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींच्या उपस्थितींची ओळख पटविण्याची संधी मिळाली आहे. कमी उंचीच्या या डायनासोरने स्वत:ला वातावरणाच्या अनुकूल करून घेतले होते. शारीरिक स्वरुपात हा डायनासोर अत्यंत छोटा आहे, परंतु याची मान अत्यंत अधिक लांब आहे, अशा स्थितीत हा अत्यंत सहजपणे झाडांच्या उंच फांद्यांपर्यंत पोहोचायचा. क्यूंकासौरा पिन्टीक्विनिएस्ट्रा युरोपमध्ये आढळून आलेल्या सर्वात पूर्ण सॉरोपोड सांगाड्यांपैकी एक आहे असे मोचो यांनी म्हटले आहे.