For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मान्सूनचे वारे

06:47 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
मान्सूनचे वारे
Advertisement

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे अंदमान-निकोबार बेटांवर आगमन झाल्याने   आता खऱ्या अर्थाने मोसमी पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनचे प्रवेशद्वार  अशी अंदमान बेटाची ओळख आहे. म्हणूनच अंदमानमध्ये मान्सून कधी सक्रिय होतो, याला भारतीय हवामानशास्त्रात मोठे महत्त्व दिले जाते. खरे तर दरवषी 20 ते 22 मेच्या आसपास अंदमानात मोसमी पावसाच्या सरी बरसतात. यंदा मान्सून नऊ दिवस आधीच अंदमानात पोहोचल्याने बळीराजासह समस्त भारतवासियांच्या चेहऱ्यावर आनंदलहरी उमटलेल्या दिसतात. भारतासारखा उष्णकटिबंधीय देश हा प्रामुख्याने मान्सूनच्या पावसावरच अवलंबून असल्याचे पहायला मिळते. आजही कृषिप्रधान देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातील जवळपास 65 टक्क्यांहून अधिक लोक शेतीशी या ना त्या माध्यमातून निगडित असल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे, तर थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मान्सून खोलवर परिणाम करीत असल्याचे दिसते. यातूनच मान्सून हा देशासाठी किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात यावे. यंदा भारतीय हवामान विभागाने तब्बल 105 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्या अर्थी यंदाचे वर्ष दमदार पावसाचे असल्याचे दिसते. मान्सूनच्या प्रवासात एल निनोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एल निनोचा प्रभाव राहिला, तर पावसामध्ये व्यत्यय येण्याची दाट शक्यता उद्भवते. सुदैवाने या वर्षी असा कोणताही धोका संभवत नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचबरोबर चालू वर्षी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह देशाच्या अनेक भागांत दमदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हे शुभचिन्हच ठरावे. मागच्या काही वर्षांत पावसाळ्यामध्ये खंड जरूर पडले. पण, एकूणच सरासरीचा विचार करता पावसापाण्याच्या दृष्टीने अलीकडचा काळ बरा गेला. असे असले, तरी उन्हाळ्यातील दुष्टचक्र काही संपत नाही. यंदाचा उन्हाळाही तसा चांगलाच कडक म्हणता येईल. ऐन मेमध्ये पावसाने दिलासा दिला असला, तरी आधीच्या तीन चार महिन्यात उन्हाळ्याचा बसलेला तडाखा अभूतपूर्वच ठरतो. पाण्याची टंचाई, आटलेल्या विंधन विहिरींचा प्रश्न कायम असून, त्यावर पावसाशिवाय दुसरा उतारा नसेल. तशी मागच्या आठ ते दहा दिवसांत सर्वदूर चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. आणखी दोन ते तीन दिवस पावसाचे हे सत्र कायम राहण्याचा अंदाज आहे. हा पूर्वमोसमी पाऊस असल्याचे म्हटले जाते. वास्तविक मान्सूनआधीचा पाऊसही अतिशय महत्त्वाचा असतो. वळवाचा पाऊस उकाड्याने हैराण झालेल्या प्राणीमात्रांना गारव्याचा अनुभव देतो. तर पूर्वमोसमी म्हणजेच पावसाआधीचा पाऊस शेतीच्या मशागतीच्या कामांसाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र, मागची काही वर्षे वळवाचे व मान्सूनपूर्व पावसाचे गणित बिघडल्याचे पहायला मिळते. हे बघता यंदाच्या पूर्वसरीही समाधानकारक ठरतात. सध्या अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस होत आहे. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे, उत्तर अंदमान समुद्राचा भाग मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. पश्चिमी वाऱ्यांना बळकटी मिळाल्याने हा पाऊस कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांचा पुढचा प्रवासही निर्विघ्नपणे होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात. केरळ म्हणजे देवभूमी आणि पर्जन्यभूमी. अंदमानचा पुढचा मुक्कात असतो, तो निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या नितांतसुंदर प्रदेशावर. सर्वसाधारणपणे केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या आसपास पोहचतो. तथापि, यंदा तो वेळेच्या आधी म्हणजे 27 मेपर्यंत देवभूमीत प्रवेश करणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे.  या अंदाजाप्रमाणे खरोखरच केरळात मोसमी पाऊस नियोजित वेळेआधी आला, तर त्याला खऱ्या अर्थाने गती मिळण्याची चिन्हे असतील. केरळात सक्रिय झाल्यानंतर सातच दिवसांत मान्सून महाराष्ट्राची सीमा ओलांडतो, असा परिपाठ आहे. कोणतेही हवामानीय अडथळे उद्भवले नाहीत, तर हा प्रवास ठरल्याप्रमाणे होतो. तशी सात जून ही महाराष्ट्र आगमनाची ठरलेली तारीख. मृग नक्षत्राचा प्रारंभबिंदू. किंबहुना, यंदा दक्षिण महाराष्ट्रात मान्सून 6 जूनला, तर पुण्यामुंबईत 10 ते 11 जनूपर्यंतच पोहोचण्याची चिन्हे आहेत. याशिवाय 15 जुलैपर्यंत देश व्यापणारा मोसमी पाऊस त्याआधीच देशभर सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हे पाहता या वर्षी शेतीभातीच्या कामाला शेतकऱ्यांना लवकरच लागावे लागेल. पाऊस म्हटले, की पावसाळी नियोजन आले. पुढच्या काही दिवसांत पावसाळी व्यवस्थापनाकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागेल. अलीकडे 25 ते 30 मिमी पावसातही देशातील शहर व्यवस्थेचा बोजवारा उडतो. त्यामुळे 100 मिमी वा त्यापेक्षा अधिकच्या पावसात शहर नियोजनाचे पार तीन तेराच वाजतात. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक उपाययोजना आत्तापासून करायला हव्यात. चिपळूण, कोल्हापूर, सांगली यांसारख्या शहरांतील अनुभव लक्षात घेऊन पूरपूर्वनियोजनावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर पूरसदृश स्थितीशी सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या पाहिजेत. यंदाच्या उन्हाळ्यात अनेक भागांत तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या. हे पाहता पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे, हीदेखील महत्त्वाची बाब ठरते. गावागावांत पाण्याचा थेंब कसा जिरवता येईल, साठवता येईल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. शहरांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिमची चर्चा नेहमी होते. मात्र, अजूनही या योजनेला व्यापक रूप आल्याचे दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पावसाचे पाणी वायाच जाते. हेच पाणी भूजलात जिरवले गेले, तर त्यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. परंतु, दुर्दैवाने त्याकडे लक्ष दिले जात नाही. खरे तर मोसमी पाऊस हे सराईचे, भरभराटीचे व आनंदाचे प्रतीक मानले जाते. पाऊस आपल्यासोबत समृद्धीचे दिवस घेऊन येतो, अशी लोकांची पूर्वापार धारणा आहे. ती खरीच होय. यंदाचा मोसमी पाऊसही असाच निखळ आनंद आणि समृद्धी घेऊन येईल आणि सारा देश सुजलाम् सुफलाम् करेल, असा विश्वास वाटतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.