आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
वाल्मिकी निगम, मुडा घोटाळ्यासंबंधी सरकारला घेरण्यास विरोधी पक्ष सज्ज
प्रतिनिधी/ बेंगळूर
16 व्या विधानसभेच्या चौथ्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज 26 जुलैपर्यंत चालणार आहे. कावेरी पाणी वाटपाचे संकट, गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेली दिरंगाई, महर्षि वाल्मिकी निगममधील गैरव्यवहार, म्हैसूरच्या मुडातील घोटाळ्यासह विविध समस्यांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी भाजप-निजद दोन्ही विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. महर्षि वाल्मिकी विकास निगममधील कोट्यावधी ऊपयांचा गैरव्यवहार आणि म्हैसूरच्या मुडा घोटाळ्याचे कारण देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. काँग्रेस सरकार विकासाला प्राधान्य दिले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेच्या अधिवेशनात हा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला जाण्याची शक्मयता आहे.
पावसाच्या नुकसानीची भरपाई देण्यास झालेला विलंब, गेल्या वषीच्या दुष्काळाची भरपाई देण्यास झालेला विलंब, राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ, दुधाच्या दरात झालेली वाढ यासह अनेक मुद्दे विरोधकांचे हत्यार ठरणार आहेत. सत्ताधारी पक्षानेही विरोधकांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे. भाजपच्या सत्ताकाळातील त्रुटी समोर आणून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नुकतेच निधन झालेल्या मान्यवरांना श्र्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृत कामे सुरू होतील.
मंगळवारपासून अधिवेशनात कावेरी नदीच्या पाण्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्मयता आहे. लोकसभा निवडणुकीत युती करणाऱ्या भाजप आणि निजदने अधिवेशनातही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूर येथील मुडा घोटाळा, वाल्मिकी निगम गैरव्यवहार, अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनुसूचित जातीच्या निधीचा गैरवापर, शेतकरी आत्महत्या प्रकरणे आदी अनेक मुद्दे सभागृहात प्राधान्याने मांडण्याची तयारी केली आहे.
राज्यातील दुष्काळाची समस्या, पावसाचा अभाव, डेंग्यूमुळे होणारे मृत्यू, कायदा आणि सुव्यवस्था, दूध उत्पादकांना प्रोत्साहनपर सवलत देण्यास होणारा विलंब असे अनेक मुद्दे उपस्थित करून विरोधी पक्ष सरकारला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या बाबींवर जोरदार चर्चा होण्याची शक्मयता आहे. 9 दिवस चालणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होणार, हे निश्चित आहे.
मांडले जाणारे महत्त्वाचे विधेयके
ग्रेटर बेंगळूर विधेयक, कन्नड भाषा विधेयक, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कर्नाटक वैद्यकीय नोंदणी आणि इतर कायदे दुऊस्ती विधेयक, बागायती रोपवाटिका परवाना आणि नियमन करण्यासाठी बागायती रोपवाटिका दुऊस्ती विधेयक, कर्नाटक प्रशासकीय विधेयक यासह एकूण 8 विधेयके या अधिवेशनात मांडली जातील.
अधिवेशन वाढवण्याची मागणी
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 26 तारखेपर्यंत चालणारे अधिवेशन एक आठवड्याने वाढवावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभागृह कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्मयता आहे.