15 ते 26 जुलै दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन?
तारीख निश्चित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यावर विसंबून
बेंगळूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 15 ते 26 जुलै या कालावधीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै महिन्यात अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनाची तारीख निश्चित करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांवर सोडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्यमंत्री मंडळाची बैठक झाली. यावेळी विधिमंडळ अधिवेशन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची तारीख निश्चित करण्याचा निर्णय सिद्धरामय्या घेतील, अशी माहिती कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलै 15 ते 26 या कालावधीत बेंगळूरमध्ये होण्याची शक्यता आहे. या कालावधीत अधिवेशन घेण्यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. परंतु तारखेविषयी अंतिम निर्णय होऊ शकला नाही.