विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पंधरा दिवसांचे
21 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत चालणार : राज्यपालांकडून आदेश जारी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान होणार असून, यंदाचे पावसाळी विधानसभा अधिवेशन 15 दिवसांचे होणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत चालणारे हे अधिवेशन सुटीचे दिवस वगळता 15 दिवसांचे असेल, असा आदेश राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काढला आहे. राज्याच्या आठव्या विधानसभेच्या यंदाच्या अधिवेशनाचे दहावे सत्र आहे.
15 दिवसांचे कामकाज विधानसभा अधिवेशनाचे चालणार असून, राज्याच्या आठव्या विधानसभेचे हे दहावे सत्र आहे. मागील दोन अल्पकालीन अधिवेशनांमध्ये चर्चेसाठी अपुरा वेळ मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या विविध योजनांच्या मागण्यांवर चर्चा होणार असून, काही महत्त्वाची विधेयके देखील सरकारकडून मांडली जाण्याची शक्यता आहे.
गत पावसाळी अधिवेशनातील कार्यकाळापेक्षा यंदा तीन दिवसांनी अधिवेशन कमी करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता कामकाजाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विविध योजनांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहेत. अधिवेशनात राज्यातील बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, अपघात, तसेच खाण लिलावासारख्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.