`पावसाळी अधिवेशन : सरकार बचावात्मक, विरोधक आक्रमक
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्यास आता आठवड्याचाच वेळ राहिलेला असताना नरेंद्र मोदी सरकार बचावात्मक पवित्र्यात तर विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. पाकिस्तानबरोबरील लढाईचे ऑपरेशन सिंदूर झाल्यावर ताबडतोब संसदेचे विशेष सत्र घेण्याची विरोधकांची मागणी दीड महिन्यांपूर्वी धुडकावून लावून सरकारने आपलेच पितळे उघड पाडले. पाकिस्तानबरोबरील लढाईनंतर ज्या एकूणएक घटना घडलेल्या आहेत त्याने जागतिक व्यासपीठावर भारताचे एकाकीपण अतिशय केविलवाणे दिसत आहे. स्वत:ला विश्वगुरू समजणारा देश एकदम एकटा कसा काय बरे झाला ? याबाबत सरकारला जाब विचारणारे असंख्य प्रश्न विरोधकांनी विचारले आहेत त्याला उत्तर मिळालेले नाही.
भारत दिवसेंदिवस अमेरिकेवर विसंबत चालला आहे असे चित्र निर्माण झाल्याने नाराज झालेला रशिया हा आता पाकिस्तानबरोबर आपले संबंध झपाट्याने सुधारू लागलेला आहे. भारताला अमेरिकेची मैत्री हवी असेल तर त्याने रशियामधून शस्त्रात्रे घेणे पूर्णपणे बंद केले पाहिजे अशा एकप्रकारे अटीच अमेरिकन नेते घालत आहेत. याउलट नेहरूंच्या काळापासून जगात स्वत:ची छाप सोडणारा भारत अमेरिकेच्या कच्छपी लागलेला आहे, असे अजब चित्र दिसू लागले. भारत-पाक युद्धात आपणच समझोता केला असे दावे करत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि त्याच्या नेतृत्वाचा दिवसरात्र पाणउतारा करून फार अवघड स्थितीत आणून सोडलेले आहे. एव्हढेच नव्हे तर युद्धखोर असे पाकिस्तानचे वादग्रस्त जनरल असीम मुनीर यांना समज देण्याऐवजी त्यांचा जणू सत्कार करत व्हाईट हाऊसमध्ये खास मेजवानी देत ट्रम्प यांनी भारताच्या दु:खाला डागण्या दिलेल्या आहेत. स्वत:ला जगातील उदयोन्मुख सत्ता मानणाऱ्या भारताकरता जणू आभाळच फाटले आहे.
‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार‘ असाच काहीसा हा प्रकार झालेला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्सच्या शिखर संमेलनात पंतप्रधान गेले खरे. पण तेथेदेखील भारताला अपशकूनच पदरात पडला. चीनचे नेते शी जीन पिंग तसेच रशियाचे व्लादिमिर पुतीन यांनी अनुपस्थित राहून ब्राझीलमध्ये झालेल्या या संमेलनाचे औचित्यच नाहीसे केले. एव्हढेच नव्हे तर अमेरिका धार्जिणी भूमिका घेतलेल्या भारताचे ब्रिक्समध्ये प्रयोजनच काय? असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित करणे सुरु केले आहे. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, आणि साऊथ आफ्रिका या प्रमुख गैर-अमेरिका देशांचा समूह होय. अमेरिकेच्या दादागिरीला झुगारून देण्यासाठी हा गट स्थापन झाला होता. दुष्काळात तेरावा महिना या न्यायाने ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या सदस्य देशांना जणू शिक्षा देण्याच्या उद्देशाने 10 टक्के वाढीव व्यापार कर लागू करण्याची धमकी दिली आहे.
नुकत्याच झालेल्या इराण-इस्राईलच्या युद्धात भारताने इस्राईलची बाजू घेऊन मुस्लिम जगतात स्वत:ला अजूनच कोंडीत टाकलेले आहे. इराण हा भारताचा पारंपरिक मित्र असताना त्याला वाऱ्यावर सोडून आक्रमक इस्राईलच्या बाजूने उभे राहिल्याने आपण अमेरिकन कळपात गेलेलो आहोत अशी टीका वाढत आहे. भारताच्या परराष्ट्र नीतीचे एव्हढे दिवाळे कधी वाजले नव्हते अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत. या अधिवेशनात भारताच्या पररराष्ट्र नीतीचा लेखाजोखा विचारला जाणार आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अगोदरच विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेले आहेत.
चातकाप्रमाणे भारत अमेरिकेबरोबर नव्या व्यापार कराराची वाट बघत असताना ट्रम्प यांनी त्याला अजून एक धमकी दिलेली आहे. भारतातून आयात होत असलेल्या औषधांवर 200 टक्के कर लावण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे. भारतापुढे अजून काय वाढून ठेवलेले आहे ते जेव्हा हा करार प्रत्यक्षात होईल तेव्हा कळणार आहे.
या ससेहोलपटीतून कसा मार्ग काढावयाचा हा यक्षप्रश्न उपस्थित झालेला असताना चीन आणि पाकिस्तानचे वाढलेले गुळपीठ भारताला येत्या काळात सळो कि पळो करणार याबाबत केवळ तज्ञमंडळीच नव्हे तर वरिष्ठ लष्करी अधिकारी चिंता व्यक्त करत आहेत. भारतीय लष्कराचे उपप्रमुख राहुल सिंग यांनी पाकिस्तानबरोबरील पुढील कुठलीही लढाई ही चीनबरोबरदेखील आहे असे समजून तयारी केली गेली पाहिजे असे संकेत दिलेले आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाने चीन आणि पाकची मैत्री वाढवली असा आरोप विरोधक फार काळापासून करत आहेत. थोडक्यात काय तर या अधिवेशनात भर पावसाळ्यात सरकारला उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत.
घरादारात एव्हढे सारे प्रश्न आ वासून उभे असताना पंतप्रधान जेव्हा नुकतेच एका भल्या मोठ्या विदेश यात्रेला रवाना झाले तेव्हा भाजपतील असंतुष्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांना टोमणा मारला. ‘नरेंद्र मोदी यांनी एकतर पंतप्रधानपदी राहावयाचे ठरवावे, नाहीतर प्रवासाची फार आवड असेल तर परराष्ट्र मंत्रिपद केवळ सांभाळावे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांनी विरोधकांचे लक्ष्य बनलेले आहेत. अगदी त्याच प्रकारे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान बोलले, ज्या देशांची नावेदेखील कोणाला फारशी माहित नाहीत अशा इटुकल्या -चिटुकल्या देशांना भेटी देऊन मोदी भारताचे काय बरे भले करणार?
गेले दशकभर मोदी पायाला भिंगरी लावल्यासारखे परदेशात फिरले. पण पाकिस्तानबरोबरील युद्धात भारताच्या बाजूने इस्राईल शिवाय एकही देश उभा राहिलेला नाही. या नव्या वास्तवाने देशभरात खळबळ माजवलेली आहे. भारताचे मित्र असे कसे अचानक गायब झाले? हा प्रश्न देशाला सतावत आहे. अशातच ट्रम्प हे भारताला अजून अडचणीत आणण्याचे राजकारण खेळत असताना पंतप्रधानांनी धारण केलेले मौन देशवासियांना बुचकळ्यात पाडत आहे.
येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्ष हे अविश्वासाच्या ठरावाचे ब्रह्मास्त्र आणणार काय अथवा कसे याबाबत पुढील एक-दोन आठवड्यात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. गेल्या अकरा वर्षात मोदी सरकार प्रथमच एव्हढे निष्प्रभ दिसू लागलेले आहे. राज्यातील पक्षाची सरकारे देखील फारशी ठिक काम करत नसून ‘डबल इंजिन‘ची जाहिरात फिकी पडू लागली आहे.
हा मेसेज कोणाला?
अशावेळीच संघप्रमुख मोहन भागवत यांच्या एका वक्तव्यामुळे राजधानीच्या राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत. मोरोपंत पिंगळे यांच्यावरील एक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सरसंघचालकांनी पिंगळे यांनी पंचाहत्तरी झाली तेव्हा आता पुढच्या पिढीकडे काम सोपवायची ही जणू घंटीच आहे असे सूचवले होते. भागवत यांनी याबाबत कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांना खरोखरच काय संदेश द्यायचा आहे याबाबत चर्चा सुरु झालेली आहे. विरोधकांना एक विषय मिळालेला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप आणि संघ यात एक प्रकारचे शीतयुद्ध सुरु आहे असे म्हटले जात असताना भागवत यांनी खरोखर कोणाची टोपी उडवली ते येणारा काळ दाखवणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान 75 पूर्ण करून 76व्या वयात पदार्पण करणार आहेत. गमतीची गोष्ट अशी कि त्या महिन्यातच भागवत देखील 75 पूर्ण करणार आहेत. विरोधकांवर नेहमी आगपाखड करणारे भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात निवृत्त झाल्यावर आपण काय काय करणार याची जंत्रीच वाचल्याने राजधानी दिल्लीत गोंधळ उडाला नसता तरच नवल होते. जुलै महिना राजकीयदृष्ट्या मोठा महत्त्वाचा ठरणार कि काय ते येत्या अधिवेशनात बघायला मिळणार आहे. सारे काही आलबेल नाही असे वाटत असताना भाजपचा अध्यक्ष येत्या पंधरवड्यात निवडला गेला तर त्यावरून वातावरण कितपत गरम आहे अथवा कसे ते दिसणार आहे. घोडामैदान जवळच आहे.
सुनील गाताडे