मान्सूनची चाहूल
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनच्या प्रवासाला नियोजित वेळेआधीच सुऊवात होणे, ही देशासाठी आणि समस्त देशवासियांसाठी आनंदाचीच बाब म्हटली पाहिजे. पाऊस हे आनंदाचे, समृद्धीचे व भरभराटीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या आनंदघनाचे आगमन हा संबंध सजीवसृष्टीकरिता एक रम्य सुखसोहळाच असतो. मान्सूनच्या सांगाव्याने हा सोहळा आता नजरेच्या टप्प्यावर आला आहे. दरवर्षी 22 मे रोजी मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटावर दाखल होतो. त्यामुळे अंदमानला मान्सूनचे प्रवेशद्वार असे संबोधले जाते. यंदा नियोजित वेळेच्या तीन दिवस आधीच मोसमी पाऊस देवभूमीत सक्रिय होणे, हे शुभचिन्हच ठरावे. त्यामुळे त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल नक्कीच अपेक्षा ठेवता येतील. मान्सूनचे आगमन व पुढील वाटचाल, हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. अंदमाननंतर केरळात 1 जून, तर महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मोसमी पावसाला प्रारंभ होतो. तथापि, सध्याचा मान्सूनचा मूड बघता त्याआधीही तो सक्रिय होण्याची दाट चिन्हे दिसतात. आजमितीला मान्सूनने मालदीव, कमोरीन, निकोबार बेटे, अंदमानचा समुद्र व्यापला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव कोमोरीनचा आणखी काही भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग तसेच अंदमान निकोबार बेटे व समुद्राचा बराचसा भाग व्यापेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे द्रोणीय स्थितीमुळे केरळ तसेच तामिळनाडूमध्ये गेले दोन दिवस अतिवृष्टी होत आहे. बुधवारीही केरळात पावसाचा रेड अलर्ट, तर तामिळनाडूला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने 31 मेपर्यंत मोसमी पावसाचे केरळात आगमन होणार असल्याचे म्हटले आहे. स्वाभाविकच तळकोकणातही लवकरच मान्सून येण्याच्या आशा बळावलेल्या पहायला मिळतात. हे पाहता सगळ्यांचे डोळे आता त्याच्याकडे लागले आहेत. मागचा हंगाम पाऊसपाण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण असाच गेला. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत पावसाने ताण दिला. त्यामुळे अनेक भागांत सरासरीही गाठली गेली नाही. याचा परिणाम मागच्या चार ते पाच महिन्यांत जाणवत आहे. पाण्याच्या दृष्टीने मार्च, एप्रिलसह चालू महिना अतिशय अटीतटीचा चालला आहे. गावे, वाड्यावस्त्यांसह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत पाण्याच्या दुर्भीक्ष्यावर पुरेसा प्रकाश पडला नाही. त्यामुळे त्याची तीव्रता सर्वांपर्यंत पोहोचू शकली नाही. काही भागांत वळवाचा पाऊस झाल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि, महाराष्ट्रातील अनेक धरणांतील जलसाठ्याने तळ गाठल्याचे दिसून येते. मागच्या 44 वर्षांत पहिल्यांदाच उजनी धरणातील पाणीसाठा उणे 60 टक्क्यांवर घसरला आहे. 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो. म्हणजे सर्वदूर पावसाला अद्याप बराच अवधी आहे. हे पाहता ही वजाबाकी 63 ते 65 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, अशी भीती जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाची वाटचाल सुव्यवस्थित होणे व त्याचे प्रमाण चांगले राहणे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल. यंदा हवामान विभागाने देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मागच्या वर्षीच्या मान्सूनला एल निनोची झळ बसली होती. या वर्षी तशी स्थिती नाही. एल निनोचा प्रभाव आता ओसरत आहे. पावसाळ्याचे आगमन होत असताना एल निनो हा घटक पूर्णपणे बाजूला झालेला असेल. त्यामुळे मोसमी पावसाचा प्रवास सुकर होऊ शकेल. ही निश्चितच चांगली बाब म्हणावी लागेल. यंदा देशात वायव्य पूर्व, इशान्येचा भाग वगळता सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह सर्वदूर दमदार पावसाची लक्षणे आहेत. चिंब पावसानं झालं रान आबादानी, हा निसर्गानुभव यंदा येण्याची आशा बाळगायला हरकत नाही. मागच्या वर्षी राज्याकडे वळवाच्या पावसाने पाठ फिरविली होती. पूर्वमोसमी पाऊसही फारसा झाला नाही. मान्सून वेळेवर आला, परंतु त्याच्या प्रवासात खंड राहिले. यंदा वळवाचा पाऊस बऱ्याच भागांत चांगला झाला. पूर्वमोसमी सरीही बरसत आहेत. या पावसाने पावसाळ्यापूर्वीची एक पार्श्वभूमी तयार होत असते. तास, दीड तास जोरदार बरसणाऱ्या या पावसाने तप्त झालेल्या जमिनीत काहीसा ओलावा निर्माण होतो. अगदी आटलेली भूजल पातळीही काही प्रमाणात का होईना वाढते. गेल्या आठवडाभरातील पावसाने महाराष्ट्राच्या काही भागांत भूजल पातळी वाढल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे बंद पडलेल्या कूपनलिका पुन्हा सुरू झाल्या आहेत. यंदा चांगला पाऊस पडणार असला, तरी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता, मुरवता कसा येईल, पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल, हे पहायला हवे. शहरात काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरायला वावच राहिलेला नाही. दाटीवाटीने, परस्परांना चिकटून बांधलेल्या इमारतींमुळे ही समस्या अधिकच वाढलेली आहे. हे पाहता शहरनियोजनावर भर द्यायला हवा. नागरिकांनीही संबंध क्राँक्रिटीकरण न करता आजूबाजूला जागा सोडणे, झाडे लावणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपाय योजणे, या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत. जेणेकरून उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. यंदा अतिवृष्टीचा अंदाज गृहीत धरूनही उपाययोजना केल्या पाहिजेत. ओला दुष्काळ काय असतो, हे चिपळूण, कोल्हापूर, सांगलीसारख्या शहरांनी वेळोवेळी अनुभवले आहे. त्यामुळे पूरपूर्व नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असून, 24 मेपर्यंत याची तीव्रता वाढून त्याचे वादळात ऊपांतर होण्याची शक्मयता आहे. त्याकडेही लक्ष ठेवले पाहिजे. दुसरीकडे राजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच दिल्लीत मागच्या काही दिवसांत अती तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्लीत उन्हाळ्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद 47.7 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. पुढील चार दिवस ही तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यात यंदाचा एप्रिल सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन, जलसंधारणाबरोबरच निसर्गाची कास धरायला हवी.