निसर्गरम्य आंबोलीत मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे आयोजन
आंबोली | वार्ताहर
निसर्गरम्य आंबोली आज भल्या पहाटे उत्साहाने सळसळली होती. आणि त्याचे कारण होते, आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा .सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन १६ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता स्पर्धक आणि क्रीडारसिक यांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाली. या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशालजी परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. यातील पहिला टप्पा २१ किलोमीटरचा तर दुसरा ६ किलोमीटरचा ठेवण्यात आला होता. या दोन्ही गटात मिळून पाचशेपेक्षाही अधिक स्पर्धकांनी घेतलेला सहभाग आणि हजारो क्रीडा रसिकांनी उपस्थित रहात टाळ्यांच्या गजरात दाखवलेला पाठिंबा हे या आंबोली मान्सून मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. पहाटेच्या धुक्यात दौडणाऱ्या स्पर्धकांमुळे आज आंबोली उत्साहाने सळसळत असल्याचे चित्र दिसून आले. या स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या समवेत आंबोली रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर, ॲड.अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, माजी जि.प. सदस्य पंढरी राऊळ, संतोष पालेकर, दिलिप भालेकर, केतन आजगांवकर, उत्तम नार्वेकर, आंबोली ग्रा. पं. सदस्य सौ. छाया नार्वेकर, कोजमा डिसोजा, मायकल डिसोजा, जितू गावकर, विनायक ठाकूर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, मंदार पिळणकर, धिरेंद्र म्हापसेकर, बुथ अध्यक्ष विराग मडकईकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, गणेश पडते, डॉ. कमलेश चव्हाण, काका भिसे, प्रदिप जाधव, जोस्ना कर्पे, गजानन कर्पे, पुंडलीक कदम आदी मान्यवर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
आंबोली ग्रामपंचायतीने पहाटे सहा वाजता स्पर्धा सुरू होणार असूनही सहभागी स्पर्धा आणि प्रेक्षक यांच्या गर्दीचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते.कबीर नावेद हेरेकर या आठ वर्षाच्या मुलाने या स्पर्धेत सहभाग घेतला. आतापर्यंत त्याने दहा मॕरेथॉन स्पर्धेत भाग घेतला असून आंबोली मान्सून मॕरेथॉन ही त्याची अकरावी स्पर्धा होती. हा छोटा मुलगा निष्णात सर्पमित्र असून त्याने आतापर्यंत वेगवेगळे साप, अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत. आंबोली नॅचरल डायव्हर्सिटीच्या पार्श्वभूमीवर हा छोटा मुलगा आयकॉन ठरला होता.
आंबोली मान्सून मॅरेथॉनच्या २१ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत पुरुष गटातून सिद्धेश बारजे प्रथम तर सिद्धनाथ जगताप द्वितीय व कल्पेश भुजबळ तृतीय विजेते ठरले. महिला गटातून दीपिका चौगुले पल्लवी मुटगेकर द्वितीय, सारिका काकतकर तृतीय विजेती ठरली आहे. त्यानंतरच्या, ६ किलोमीटर टप्प्याच्या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटात ऋतिक वर्मा प्रथम, पृथ्वीराज पोवार द्वितीय तर पृथ्वीराज कांबळे तृतीय विजेते ठरले, तर मुलींच्या गटातून आयुष्या राऊळ प्रथम, हंसिका गावडे द्वितीय , श्रुता फर्नांडिस तृतीय विजेत्या ठरल्या आहेत. १८ वर्षावरील पुरुष गटात ओंकार बायकर प्रथम, संदीप जयशी द्वितीय , अमेय धूळप तृतीय तर महिला गटात वैष्णवी चौधरी, श्रावणी, अदिती यांनी विजेतेपदाची मोहोर उमटवली.अनेक क्रिकेट स्पर्धांचे देशपातळीवर मालवणी भाषेत दणकेबाज समालोचन करणारे प्रसिद्ध समालोचक श्री बादल चौधरी यांच्या निवेदनाने पूर्ण स्पर्धेवर एक उत्साहाचे गारुड पसरले होते.