उचगाव भागात माकडांचा हैदोस
नागरिकांवर हल्ले होत असल्याने भीती : बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरात माकडाच्या कळपानी अक्षरश: हैदोस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर माकडे न घाबरता नागरिकांवर हल्ले करत आहेत. परिणामी या भागातील नागरिक भयभीत झाले असून, वनखात्याने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे. अतिवाड, बेकिनकेरे, उचगाव, बसुर्ते, कोणेवाडी, बाची, कल्लेहोळ, सुळगा, गोजगे आदी गावात वैजनाथ, देवरवाडीच्या डोंगराळ भागातून माकडांचे मोठ कळप सातत्याने या परिसरातील गावांमध्ये संचार करत नागरिकांची गैरसोय करत आहेत. अनेक गावातील घरांच्या टेरेसवर घातलेले खाद्य पदार्थांची नासधूस करणे, कौलारू घरावरून नाचून कौले फोडणे, पाण्याच्या टाक्यावर उड्या मारणे असे सर्रास प्रकार घडत आहेत. तसेच टेरेसवर थांबलेली लहान मुले, महिला यांच्यावर सातत्याने हल्ला करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. काही जण त्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. सदर गावे डोंगराळ भागापासून जवळ असल्याने या माकडांचे कळप सातत्याने या गावातून फिरत असतात याचा नाहक त्रास जनतेला सातत्याने सहन करावा लागत आहे. वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना राबवाव्यात. जेणेकरून या गावाला माकडांपासून होणारा नाहक त्रास थांबवावा अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.