‘रेंट अ कार’च्या परवान्यासाठी होतात पैशांचे व्यवहार : सरदेसाई
तक्रास आल्यास सखोल चौकशीची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पणजी : सरकारने रेंट अ कार परवाने देणे बंद केले असले तरी एजंटद्वारे लोकांना परवाने मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले जात आहेत. यामध्ये मंत्र्यांचे स्वीय सचिव गुंतले असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी सूचना आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला केली. काल बुधवारी विधानसभेत शून्य तासाला लक्ष्यवेधी सूचनेच्या स्वऊपात आमदार विजय सरदेसाई यांनी रेंट अ कारचा परवाना देण्यासाठी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला पैसे देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सरकारने रेंट अ कार हा प्रकारच बंद केला आहे. परंतु फ्रेंचायझीच्या नावाने काही रेंट अ कार चालू असल्याचे खात्याकडून समजले तेव्हा 2018 साली त्वरित फ्रेंचायझीही रद्द करावी, असे निर्देश दिले होते. रेंट अ कारमुळे अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने लावली जात होती. जीएसटीही बुडण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे रेंट अ कार परवान्यासाठी कुणी पैसे घेत असेल तर याविऊद्ध तक्रार आल्यास जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले.
मंत्र्यांच्या पीएची चौकशी करा
फातोर्डा मतदारसंघातील शेकडो लोकांकडून प्रती एक लाख ऊपये घेण्यात आलेलेले आहेत. सरकारने आता रेंट अ कार योजना बंद केल्यामुळे आता हे पैसे परत देण्यासाठी लोक मागणी करतात. परंतु है पैसे मंत्र्यांच्या पीएकडे गेल्याचे एजंट लोक लोकांना सांगत आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या पीएची चौकशी करून लोकांचे गेलेले पैसे परत मिळणार का अशी विचारणा आमदार सरदेसाई यांनी सभागृहात केली.
आरोप नकोत; तक्रार द्या : माविन गुदिन्हो
विजय सरदेसाई हे वारंवार आरोप करतात. त्यांनी आरोप करण्यापेक्षा अमूक मंत्र्याच्या पीएने पैसे घेतले हे पुराव्यासह तक्रार करावी. तक्रार दिल्यास या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही हाच धागा पकडत आमदार सरदेसाई यांना रितसर चौकशी देण्याची सूचना केली.