विविध योजनांचे पैसे आज - उद्या मिळणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची रक्कम काही कारणास्तव लाभार्थ्यांना मिळण्यास उशीर झाला असला तरी येत्या दोन दिवसांत ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ही रक्कम आज मंगळवारी किंवा बुधवारपर्यंत लाभार्थीच्या खात्यात जमा होईल. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वत: योजनांचे पैसे लाभार्थ्यांना मिळण्यासाठी लक्ष घातल्याने गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा, शेतकरी, दूध उत्पादक या सर्वांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने राबविलेल्या विविध योजना ह्या कल्याणकारी असल्याने त्याचा लाभ तळागाळातील लोकांना मिळणे हे सरकारचे ध्येय आहे. परंतु काही कारणास्तव थोडा विलंब झाला परंतु. आता गणेशचतुर्थी उत्सव तोंडावर आल्याने सरकार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
बालरथ कर्मचारी तीन महिने पगाराविना
राज्यातील बालरथ कर्मचारी म्हणून सेवेत असलेले चालक व वाहक यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही शाळांनी आपल्या फंडातील रक्कम बालरथ कर्मचाऱ्यांना देऊन त्यांचे वेतन अदा केले आहे. परंतु राज्यातील इतर काही शाळांनी अद्यापही जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे वेतन दिले नसल्याने बालरथ कर्मचाऱ्यांना चिंता सतावू लागली आहे. त्यातच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून नेमणूक केलेल्या या बालरथ कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गणेशचतुर्थीपूर्वी वेतन व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे मानधन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.