पैशाच्या राशी, बदनामीचे बॉम्ब आणि नवी संधी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एका बाजूला ‘कॅश बॉम्ब’चा स्फोट झाला. त्याचवेळी दुसरीकडे महायुतीतील नेत्यांमधील मतभेद मिटवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. दोन पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर कमी करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. भाजप धर्मनिरपेक्ष मतात फूट पाडण्यासाठी अजित पवारांना वेगळे लढवण्याचा प्रयोग करू इच्छित आहे. या प्रयोगाने अजित पवार राज्यातील सर्व ठिकाणी आपली शक्ती वाढवतील याचा अंदाज मात्र भाजपला आलेला दिसत नाही. हे लक्षात येईल तेव्हा शिंदेसेनाही वेगळे लढायचा प्रयत्न करेल, त्याने भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांच्या बंडल्ससहितच्या व्हिडिओने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी एकजुटीचे सूर ऐकू येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील धोरणांबाबतही चर्चा रंगत आहे. हे सर्व मुद्दे राज्याच्या राजकीय भविष्यावर परिणाम करू शकतात.
‘कॅश बॉम्ब’ने हादरले अधिवेशन
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (9 डिसेंबर) दानवे यांनी एक्सवर तीन क्लिप्सचा व्हिडिओ शेअर केले. यात पैशांचे ढीग दिसतात आणि अलिबागचे शिंदे सेना आमदार महेंद्र दळवी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसतात. एक व्यक्ती (चेहऱ्याविना) बॅगेतून नोटा काढून टेबलवर ठेवताना दिसते. दानवे यांनी हा ‘कॅश बॉम्ब’ म्हणत फडणवीस आणि शिंदे यांना प्रश्न विचारला, ‘शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, पण हे आमदार पैशांसह काय करत आहेत? सगळं सांगा, नाहीतर मी सांगेन.’ त्यांनी ‘दुसरा भाग’ सोडण्याचा इशारा दिला. दळवी यांनी मात्र हे आरोप फेटाळले. ‘हा व्हिडिओ बनावट आहे, रायगडमधील विरोधकांची (तटकरे) सुपारी असून दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, त्यांचा धंदा असाच आहे. आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,’ असे ते म्हणाले. शिंदे सेनेचे मंत्री संजय सिरसाट यांनीही दानवे यांनी ‘एआय’द्वारे व्हिडिओ बनवल्याचा ठपका ठेवला. पण, तो व्हिडिओ बनावट वाटत नाही. भाजपचे प्रवीण दरेकर यांनी व्हिडिओची पडताळणीची मागणी केली, तर आदित्य ठाकरेंनी ‘महायुतीतील भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले’ असे म्हटले. काँग्रेसचे अस्लम शेख यांनीही पैशांचे वाटप थांबवण्याची मागणी केली. हे प्रकरण अधिवेशनात खळबळ माजवत असून, विरोधकांच्या अल्प उपस्थितीतही सरकारला अस्वस्थ करत आहे. शिंदे सेनेचा आरोप खरा मानला तर पार्थ पवार यांचे प्रकरण ऐरणीवर असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेच त्या मुद्याला बगल देत शिंदे सेनेच्या आमदाराला बदनाम केले आणि त्यासाठी सभागृहातील मुदत संपलेले आमदार दानवे यांचा उपयोग केला असे होईल. तसे असेल तर सत्तापक्ष आपसातील तिढे सोडवण्यासाठी विरोधकांच्या हातात काकडा देत आहे त्याने सत्तेचा तंबू पेटत आहे हेच दिसून येते.
फडणवीस-शिंदे मतभेद टाळण्याचे प्रयत्न
अलीकडेच फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘शिंदे आणि मी दोन भावांसारखे आहोत. मतभेद असू शकतात, पण 2029 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल, स्वतंत्र नाही.’ शिंदे यांनीही फडणवीस यांना ‘बिग डी’ म्हणून गौरवत त्यांचे गुणवर्णन केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करून ‘मिलनाचे संकेत’ दिले. ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये जागा वाटपावरून झालेल्या वादानंतर हे पाऊल महत्त्वाचे आहे. चव्हाण यांच्यावर शिंदे सेनेचे नेते आ. निलेश राणे यांनी ‘पैशाने मतदार खरेदी’चा आरोप केला होता, पण आता एकजुटीचे सूर ऐकू येत आहेत. हे प्रयत्न स्थानिक निवडणुकांसाठी महायुतीला मजबूत करू शकतात. पण, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईसह पाच सहा महापालिकामध्ये त्यांचे पटले तर! नाहीतर मुंबईसह सर्वत्र मुसळ केरात! त्यामुळेच एकजुटीचे संकेत दिले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यातील ठाणेतील वाद संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चव्हाण यांनी शिंदे गटातील नेत्यांना हैराण केल्याचा आरोप असला तरी, अलीकडील संयुक्त सभा हे वेगळे प्रयत्न दर्शवतात.
ठाकरे बंधूंच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठीच्या एकजुटीप्रमाणे शरद आणि अजित पवार गट महापालिकांमध्ये एकत्र येऊ शकतात का? शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी अजित पवारांची युती नाकारली, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचे आणि दादांचे अंडरस्टँडिंग होईल असे दिसते. कोल्हापूरमधील चंदगड नगरपंचायतीत दोन्ही गट भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. तशी ठाणे आणि नाशिकसारख्या महापालिकांमध्येही स्थानिक पातळीवर एकजूट शक्य आहे, ज्यामुळे भाजपला धक्का बसू शकतो.
जिल्हा परिषद एकजुटीची स्पष्टता बाकी
राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीतील धोरणात एकजूट दिसते. ते कोल्हापूर झेडपी निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र लढत आहेत. महायुतीत एकत्र लढण्याचे ठरले असले तरी, महाविकास आघाडी गटांतही जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. हे धोरण स्थानिक पातळीवर मतभेद विसरून विजय मिळवण्यासाठी आहे, पण राष्ट्रीय नेत्यांच्या भेटींमुळे स्पष्ट धोरण येईल.
शिंदे-अजितदादांमुळे भाजपची रणनीती फसेल?
महायुतीत जागावाटपात भाजप मुंबई महापालिकेत 135-140 जागा घेणार असून, शिंदे व अजितदादा पक्षांना मर्यादित करण्याची रणनीती आहे. रवींद्र चव्हाण यांना ठाणे-रत्नागिरीत मुभा दिली असून, फडणवीस यांनी ‘मैत्रीपूर्ण लढतीचा’चा सल्ला दिला. शिंदे (कोंकण) आणि अजितदादा (पश्चिम महाराष्ट्र) स्वतंत्र लढले तर अनेक जिह्यांत त्यांना जास्त जागा मिळू शकतात, ज्यामुळे भाजपची ‘विस्ताराची रणनीती’ उलटून पडेल. शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाला पुन्हा उमेद निर्माण होईल. सध्या दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी भाजपच्याच राजकारणापुढे हतबल झालेले आहेत. त्यांना एकट्याने लढून सुर सापडला तर हे प्रकरण महायुतीला कमकुवत करू शकते. हे सर्व मुद्दे 2025 च्या स्थानिक निवडणुकांना आकार देत आहेत. वाद आणि एकजुटीचे हे संतुलन साधण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देईल. किंवा भाजपा सोडून चाचपडणाऱ्या इतर पक्षांना एक नवी दिशा देईल.
शिवराज काटकर