मोहनलालची कन्या करणार पदार्पण
विस्मयाची चित्रपटसृष्टीत एंट्री
मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांची कन्या विस्मया आता चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. विस्मयाचा भाऊ आणि मोहनलालचा पुत्र प्रणवने देखील तिचे चित्रपटसृष्टीत स्वागत केले आहे. 34 वर्षीय विस्मया ही मल्याळी चित्रपट ‘थुडक्कम’द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एंथनी जोसेफ करत आहे. विस्मयाने यापूर्वी मल्याळी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शिका आणि लेखिका म्हणूनही काम केले आहे. तिने ग्रेन्स ऑफ स्टारडस्ट नावाने पुस्तकही लिहिले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ती कवयित्री म्हणून नाव कमावत होती. विस्मयाने मार्शल आर्ट्समध्येही प्रशिक्षण मिळविले आहे. मुया थाई मार्शल ऑर्टसचे तिने थायलंडमधून प्रशिक्षण मिळविले आहे. याच्या मदतीने तिने 22 किलो वजन घटविले आहे. मोहनलाल यांनी मुलीच्या चित्रपटाची घोषणा करत डियर मायाकुट्टी तुझे चित्रपटासोबतचे अफेयर आयुष्यभर राहू आणि यात थुडक्कम पहिले पाऊल सिद्ध होऊ दे असे म्हटले आहे. माझी बहिण चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवत आहे. मी तिच्या या प्रवासाबद्दल अत्यंत उत्साहित आहे असे प्रणव मोहनलालने पोस्ट करत म्हटले आहे.