मोहनगा यात्रेतून परिवहनला 6 लाखांचे उत्पन्न
यात्रा विशेष बससेवेला प्रतिसाद : परिवहनला दिलासा
प्रतिनिधी / बेळगाव
मोहनगा-दड्डी यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या यात्रा अतिरिक्त बससेवेतून परिवहनला 6 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या परिवहनला काहिसा दिलासा मिळाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून 14 व 15 फेब्रुवारी रोजी दड्डी मोहनगा यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला असून परिवहनला अपेक्षित महसूल मिळाला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोहनगा-दड्डी येथील भावेश्वरी यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिवाय बेळगाव परिसरातून यात्रेला जाणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. यासाठी परिवहनने यात्रा काळात बेळगाव-दड्डी मार्गावर यात्रा विशेष बससेवेची व्यवस्था केली होती. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. या मार्गावर फुल तिकीट 90 रुपये तर हाफ 45 रुपये आकारण्यात आले होते. विशेषत: महिलांना शक्ती योजनेंतगृ मोफत प्रवास देण्यात आला होता.
| पहिल्या दिवशी 20 बस धावल्या मोहनगा-दड्डी यात्रेसाठी जादा बस सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी या यात्रेतून 7 लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा या यात्रेतून 6 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी 20 बस मोहनगा-दड्डीला मार्गावर धावल्या होत्या. - ए. वाय. शिरगुप्पीकर-डेपो मॅनेंजर |