For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहम्मद मदनी यांचा ‘जिहाद’चा इशारा

06:34 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
मोहम्मद मदनी यांचा ‘जिहाद’चा इशारा
Advertisement

न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्यावर केले अत्यंत गंभीर आरोप, भाजप-हिंदू संघटनांकडून प्रतिवार

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मुस्लीमांची गळचेपी किंवा छळवणूक झाल्यास त्यांना ‘जिहाद’ पुकारावा लागेल, अशी धमकी जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद मदनी यांनी दिली आहे. भारतात न्यायव्यवस्था आणि सरकार यांच्याकडून मुस्लीमांच्या अधिकारांना डावलले जात आहे. हे असेच होत राहिल्यास मुस्लीमांना प्रतिकार करावा लागेल, असा इशारा त्यांनी शनिवारी दिला आहे. भारतीय जनता पक्ष आणि इतर हिंदू संघटनांनी त्यांच्या धमकीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

Advertisement

मदनी यांनी सर्वोच्च न्यायालयावरही आगपाखड केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय मुस्लीमांच्या विरोधात दिले आहेत. न्यायालयावर सरकारचा दबाव असल्याचे यातून स्पष्ट होते. असे प्रतिपादन करत त्यांनी रामजन्मभूमीसंबंधीचा निर्णय आणि तीन तलाक संबंधीच्या निर्णयाचा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक निर्णय आले आहेत, जे अल्पसंख्याक समुदायांना घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करतात, अशी दर्पोक्ती त्यांनी केली आहे.

अन्य प्रकरणांचाही उल्लेख

1991 मध्ये त्यावेळच्या केंद्र सरकारने पूजा स्थळ कायदा केला होता. तो कायदा केल्यानंतरही अनेक स्थानांसंबंधीचे वाद न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या सर्व घडामोडी घटनाबाह्या पद्धतीने होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले तरच त्याला ‘सर्वोच्च’ म्हणता येईल. त्याने घटनेचे संरक्षण केले नाही, तर त्याला  ‘सर्वोच्च’ म्हणवून घेता येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतीय मुस्लीमांसंबंधी भावना

भारतातील लोकांच्या मुस्लीमांसंबंधीच्या भावनांवरही त्यांनी वादग्रस्त विधान केले. भारतातील 10 टक्के लोकांचा मुस्लीमांना पाठिंबा आहे. 30 टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत. तर उरलेले 60 टक्के लोक त्रयस्थ आहेत. मुस्लीमांना या त्रयस्थ लोकांशी सक्रीय संवाद केला पाहिजे. हे 60 टक्के लोक मुस्लीमांच्या विरोधात गेले, तर मात्र देशासमोर मोठे संकट उभे राहणार आहे. मुस्लीमांना आपले मुद्दे त्यांच्यासमोर मांडले पाहिजेत, असे आवाहन मदनी यांनी केले.

जिहाद नेहमीच पवित्र

जिहाद या संकल्पनेसंबंधी गैरसमज पसरविले जात आहेत. प्रसार माध्यमे आणि केंद्र सरकार यांनी जिहादचा विपर्यस्त अर्थ लोकांच्या मनात रुजविला आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, स्पीट जिहाद असे विपर्यस्त शब्द उपयोगात आणले जात आहेत. जिहाद हा मुस्लीमांसाठी नेहमीच पवित्र राहिलेला आहे. पुढेही तो तसाच राहील. जिहाद हा नेहमी इतरांच्या भल्यासाठीच केला जातो. मुस्लीमांचे दमन झाल्यास त्यांना जिहाद करावा लागेल, या विधानाचा पुनरुच्चार त्यांनी केला.

‘वंदे मातरम्’संबंधी प्रक्षोभक विधान

मदनी यांनी भारताचे राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’संबंधीही प्रक्षोभक विधान केले. कोणी ‘समाजा’ला वंदे मातरम् म्हणावयास सांगितले आणि त्याने ते म्हटले, तर समाज मृत आहे, असा समज होईल. कारण मृत समाजच शरण येत असतो. जर आम्ही ‘जिवंत समाज’ असू तर आम्हाला कोणत्याही स्थितीशी दोन हात करावे लागतील, असा गर्भित इशाराही मोहम्मद मदनी यांनी त्यांच्या संदेशात दिला आहे.

भाजपची तीव्र प्रतिक्रिया

मदनी भारतातील मुस्लीमांना प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते घटनात्मक संस्थांनाही अपमानित करीत आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देत असून घटनेचा उपमर्द करीत आहेत. त्यांच्यासारखे लोकच जेहादी आणि दहशतवाद्यांची निर्मिती करतात, असा पलटवार भारतीय जनता पक्षाने केला आहे.

मदनी यांच्या विधानामुळे राजकीय वादळ

ड मदनी यांच्या विधानाचे तीव्र पडसाद, भारतीय जनता पक्षाची तीव्र टिप्पणी

ड मदनी यांचे सर्वोच्च न्यायालयावरही आरोप, केंद्र सरकारवर केली आगपाखड

ड मुस्लीम समाजाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याचा आरोप

ड भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही तत्व जिहादमधून हिंसक अर्थ काढत नाही

Advertisement
Tags :

.