मोदींचा जपानमध्ये बुलेट ट्रेनने प्रवास
प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय चालकांशी चर्चा : सेमीकंडक्टर प्रकल्पालाही भेट
वृत्तसंस्था/ टोकियो
जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.
नरेंद्र मोदी शुक्रवारी 15 व्या भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या दरम्यान दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जपानी पंतप्रधानांनी पुढील 10 वर्षांत भारतात 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत चर्चा केली. जपानचा दौरा आटोपून मोदी चीनला रवाना झाले. ते रविवारी एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. याशिवाय मोदी चीनचे अध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची स्वतंत्रपणे भेट घेतील.
जपानची भेट सदैव स्मरणात राहील : मोदी
पंतप्रधान जपानचा दोन दिवसांचा दौरा संपवून चीनला रवाना झाले आहेत. जपान दौऱ्याच्या समाप्तीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘जपानची ही भेट सदैव स्मरणात राहील. हा दौरा आपल्या देशातील लोकांना फायदेशीर ठरणाऱ्या उपयुक्त परिणामांसाठी लक्षात राहील. मी पंतप्रधान इशिबा, जपानी जनता आणि सरकारचे त्यांच्या स्वागताबद्दल आभार मानतो.’ असे म्हटले आहे.
सेमीकंडक्टर प्रकल्पाला भेट
पंतप्रधान मोदींनी सेंडाई येथील सेमीकंडक्टर प्रकल्पालाही भेट दिली. पंतप्रधान मोदींनी याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंसह पंतप्रधान मोदींनी ‘पंतप्रधान इशिबा आणि मी टोकियो इलेक्ट्रॉन फॅक्टरीला भेट दिली. आम्ही प्रशिक्षण कक्ष आणि उत्पादन नवोन्मेष प्रयोगशाळेला भेट देऊन कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सेमीकंडक्टर क्षेत्र हे भारत-जपान सहकार्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांत, भारताने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. बरेच युवकही त्यात सामील होत आहेत. येणाऱ्या काळातही आम्हाला ही गती कायम ठेवायची आहे.’ असे स्पष्ट केले.
टीईएल (टोकियो इलेक्ट्रॉन फॅक्टरी) ही सेमीकंडक्टर क्षेत्रातील एक आघाडीची जपानी कंपनी मियागी भारतासोबत सहकार्याची योजना आखत आहे. पंतप्रधान मोदींना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील ‘टीईएल’ची भूमिका तिच्या प्रगत उत्पादन क्षमता आणि भारतासोबत सुरू असलेल्या नियोजित सहकार्याबद्दल माहिती देण्यात आली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उत्पादन आणि चाचणी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी असलेल्या संधींची व्यावहारिक समज नेत्यांना मिळाली, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.