हुळंदच्या 508 एकर जमिनीच्या उताऱ्यात फेरफार
संबंध नसलेल्या तीन जणांची उताऱ्यात नावे दाखल : ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांची भेट घेऊन तक्रार दाखल, ग्रामस्थांचा लढा देण्याचा निर्णय
खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील हुळंद या गावच्या ग्रामस्थांच्या मालकीच्या सर्व्हे नं. 3 मधील 508 एकर जमिनीच्या उताऱ्यात फेरफार केल्याने तसेच संबंध नसलेल्यांची नावे दाखल करण्यात आली आहेत. याबाबत शुक्रवारी हुळंद ग्रामस्थांनी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन तक्रार दाखल करून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच भूमापन विभागातील गैरकारभाराबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत विभागीय भूमापन अधिकारी पिरजादे यांनी संबंधित भूमापन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली असल्याने तालुक्यातील एजंटांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची माहिती अशी, हुळंद येथील सर्व्हे नं. 3 मधील 508 एकर जमिनीच्या कागदपत्रात आणि नावावर मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला आहे. सर्व्हे नं. 3 मधील उताऱ्यात संपूर्ण गावचा मालकी हक्क नमूद करण्यात आला होता. मात्र गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही एजंटांनी ग्रामस्थांची मालकी कमी करून फक्त मोजक्याच जणांची नावे दाखल करून आपली तीन नावे दाखल केली आहेत. याबाबत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी श्रीकांत गावडे, मोतीराम गावडे, गजानन सुतार, नागेश भट, प्रितेश गावडे, सुरेश गावडे, वासुदेव सुतार, प्रवीण गावडे, नंदिनी गावडे, गीतांजली नाईक, लक्ष्मी गावडे, सुमित्रा नाईक, सुमित्रा गवस, तारका गावडे, महादेव गावडे, प्रदीप गावडे, दामोदर गावडे, कृष्णा गावडे यासह हुळंद गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी हुळंद ग्रामस्थांची तक्रार ऐकून घेतली. आपण याबाबत कागदपत्रांची पडताळणी करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.
हुळंद येथील सर्व्हे नं. 3 मधील 508 एकर जमिनीचे सर्वेक्षण केल्याचा अहवाल भूमापन खात्याकडून करण्यात आला असून याबाबतची कागदपत्रेही तयार करण्यात आल्याचे हुळंद ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. याबाबत ग्रामस्थांनी विभागीय भूमापन अधिकारी श्रीमती पिरजादे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याच्या चौकशीसाठी विभागीय भूमापन अधिकारी पिरजादे यांनी खानापूर येथील भूमापन कार्यालयात भेट देऊन याबाबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
याबाबत काही गैरकारभार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. आणि प्रश्नांची सरबती केली. संबंधित अधिकाऱ्याकडून योग्य उत्तरे आणि कागदपत्रात फेरफार केल्याचे निदर्शनास आल्याने पिरजादे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हुळंद येथील जमिनीच्या सर्वेक्षणाच्या कागदपत्रात फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुर्गम गावांच्या स्थलांतराचा डाव
गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील दुर्गम भागातील जमिनीवर खाण क्षेत्रातील मालकांचा डोळा असून या जमिनी कमी किमतीत लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काही एजंटही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन जमिनी लाटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. खाण क्षेत्रातील मालकांना सरकारला वनक्षेत्रातील जमीन देणे गरजेचे असते. यासाठी खाण क्षेत्रातील उद्योगपतींचा तालुक्यातील जंगलाने व्याप्त असलेल्या मालकी जमिनीवर डोळा आहे. दुर्गम भागातील जमिनी त्या त्या गावातील ग्रामस्थांच्या आहेत. यात वनखात्यानेही या जमिनी हस्तांतरासाठी वेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. जेणेकरून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील गावांना स्थलांतर करण्यास भाग पाडण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे.