मेलोनींच्या आत्मचरित्रासाठी मोदींनी लिहिली प्रस्तावना
जॉर्जियांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक लवकरच रुपा पब्लिकेशन्सद्वारे भारतात प्रकाशित केले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांचे ‘देशभक्त आणि एक महान समकालीन नेता’ अशा शब्दात कौतुक केले. तसेच त्यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास भारतीय लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे वर्णनही केले. पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा संदर्भ देत सदर पुस्तकाचे वर्णन ‘मेलोनीची मन की बात’ असे केले. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता असे सांगत आपल्या दोघांमध्ये आदर, कौतुक आणि मैत्री या भावना ओतप्रत भरलेल्या असल्याचेही नमूद केले.
मेलोनी यांचे पुस्तक इटालियन व्यतिरिक्त फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजी, जर्मन आणि पोर्तुगीज भाषेत उपलब्ध आहे. आता ते लवकरच भारतातही दाखल होणार आहे. पंतप्रधान मोदींनी प्रस्तावनेमध्ये जागतिक नेत्यांसोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दलही भाष्य केले आहे. आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळातील अनेक जागतिक नेत्यांसोबतचे त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले. मेलोनीचे जीवन स्थिरतेचे आणि स्वत:च्या दृढ संकल्पाशी जोडलेले राहण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करते. स्वत:च्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करताना जगाशी समानतेने संवाद साधणे हे आपल्या मूल्यांशी सुसंगत असल्याचेही मोदींनी लिहिले आहे.
सर्वप्रथम 2021 मध्ये इटलीमध्ये प्रकाशित
मेलोनींचे आत्मचरित्र सर्वप्रथम 2021 मध्ये रिझोली पब्लिशिंगने इटलीमध्ये प्रकाशित केले. त्याची इटालियन आवृत्ती ‘आयो सोनो जॉर्जिया’ या नावाने प्रकाशित झाली. प्रकाशनाच्या पहिल्याच वर्षात या पुस्तकाच्या दीड लाख प्रती विकल्या गेल्या. ते देशात सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले होते. त्याची इंग्रजी आवृत्ती 17 जून 2025 रोजी प्रकाशित झाली. त्याची प्रस्तावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी लिहिली आहे. हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनले आहे.