पंतप्रधान मोदींकडून विजेत्या बुद्धिबळपटूंवर कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी बजावलेल्या भारताच्या युवा बुद्धिबळपटूंची बुधवारी भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. सदर स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी आपापले पहिले सुवर्णपदक जिंकले.
भारताने रविवारी इतिहास रचताना पुरुष संघाने स्लोव्हेनियाला पराभूत केले होते, तर महिला संघाने शेवटच्या फेरीत अझरबैजानवर विजय मिळवून सदर प्रतिष्ठित स्पर्धेत पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवले होते. पुरुषांच्या संघातून डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद यांनी 11 व्या आणि शेवटच्या फेरीत निर्णायक विजय मिळवले होते.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये मोदींनी आर. वैशाली, डी. हरिका, तानिया सचदेव, विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी आणि प्रज्ञानंदसह बुद्धिबळ विजेत्यांशी सधलेला संवाद पाहायला मिळतो. स्पर्धेतील स्टार राहिलेल्या डी. गुकेशने खुल्या गटात 11 पैकी 10 सामने जिंकून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या संवादादरम्यान खेळाडूंनी पंतप्रधानांना बुद्धिबळाचा पट सादर केला. त्यानंतर प्रज्ञानंद आणि एरिगेसी यांच्यात रंगलेला बुद्धिबळाचा वेगवान खेळ मोदींना मंत्रमुग्ध करून गेला.
तत्पूर्वी, क्रीडा मंत्रालयाने भारतीय बुद्धिबळ संघ हॉटेल सोडून पंतप्रधानांना भेटण्यासाठी जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. भारतीय पुरुष संघाने बुडापेस्टमध्ये 22 पैकी 21 गुणांची कमाई केली. उझबेकिस्तानविरुद्धचा एकच सामना त्यांना बरोबरीत (2-2) सोडवावा लागला. उर्वरित सर्व प्रतिस्पर्ध्यांचा त्यांनी पराभव केला.