कांदा निर्याबंदी उठवल्याशिवाय मोदींनी नाशिकला येऊ नये : अनिल घनवट
मुंबई प्रतिनिधी
भारताचे पंत्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकला येणार आहेत. कांदा निर्याबंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
राष्ट्रीय युवा मोहोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी नाशिक मध्ये येणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोदींनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यातबंदी, साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक कंगाल व कर्जबाजारी झाला आहे. आता सध्या ३१ मार्च पर्यंत निर्यातंबंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. तरी मोदी नाशिकला येण्याची हिम्मत करतात म्हणजे कांदा उत्पादक अन्याय सहन करतात असा त्यांना विश्वास आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर महत्वाची पिके ऊस आणि भात आहेत. या पिका पासून तयार होणारी साखर व तांदूळ या वर सुद्धा निर्यातबंदी आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण लुटण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने लावलेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. १२ तारखे पर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी हटविली नाही तर मोदींच्या रॅलीला व सभेला विरोध करणे आवश्यक आहे. निषेधाचे फलक घेऊन उभे रहाणे, काळे झेंडे दाखवणे, निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे बॅनर घेऊन उभे रहाणे, घोषणा देणे असे अहिंसक व लोकशाही मार्ग अवलंबून शेतकऱ्यांनी आपली नाराजी जाहीर करावी. तसे न केल्यास निर्यातबंदी विरोधात अजिबात असंतोष नाही व शेतकऱ्यांना मिळणारे कांद्याचे दर मान्य आहेत असे समजले जाईल.
हा निषेध सामान्य कांदा उत्पादकांनी करावा लागेल कारण शेतकरी संघटनेच्या व स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस आगोदर ताब्यात घेऊन स्थानबद्ध करतील. आता पासूनच समाज माध्यमांवर निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे संदेश व्हायरल होत राहिले तर भाजप नेते व सरकार पर्यंत आपला निरोप पोहोचेल व निर्यातबंदी उठेल. शेतकऱ्यांनी हिम्मत नाही दाखवली तर तोट्यात कांद्याची शेती करण्या शिवाय पर्याय नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जसे विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिले तसे निर्यातबंदी नाही उठली तर "मोदी गो बॅक", "मोदी चले जाव" अशा घोषणा देत मोदींचा निषेध करावा असे आवाहन अनिल घनवट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.