For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींकडून स्टारर यांना भारतभेटीचे निमंत्रण

06:16 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींकडून स्टारर यांना भारतभेटीचे निमंत्रण
Advertisement

धोरणात्मक भागीदारीसंबंधीही केले आश्वस्त

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे ब्रिटनमधील विजयाबद्दल अभिनंदन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांच्याशी फोनवर संवाद साधताना भविष्यात दोन्ही देशांमधील अधिक चांगले संबंध विकसित करण्याबाबतही आश्वस्त केले. याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी केवळ मजबूत आर्थिक संबंधांसाठीच नव्हे तर धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली.

Advertisement

ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. आता लेबर पार्टी नवीन सरकार स्थापन करणार आहे. लेबर पार्टीचे कीर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. ब्रिटनमधील निकाल जाहीर होताच पंतप्रधान मोदींनी स्टार्मर यांच्याशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. मोदी यांनीच सोशल मीडियावरून यासंबंधीची माहिती जारी केली आहे. आम्ही आमच्या लोकांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आणि जागतिक कल्याणासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणि मजबूत भारत-ब्रिटन आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ऋषी सुनक यांचेही कौतुक

पीएमओच्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी परस्पर फायदेशीर भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्याबाबत चर्चा केली. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांची आठवण करून देत त्यांनी ब्रिटनच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ केल्याबद्दल माजी पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांचेही कौतुक केले.

Advertisement
Tags :

.