जपानी पंतप्रधानांशी मोदींची फोनवर चर्चा
नेतेपदी निवड झाल्याबद्दल साने ताकाची यांचे अभिनंदन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जपानच्या पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली. जपानला अलिकडेच पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या. साने ताकाची यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधत नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. ‘जपानी पंतप्रधान साने ताकाची यांच्याशी चर्चा झाली. पदग्रहणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आर्थिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि प्रतिभा गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करून भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्यासाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनावर चर्चा केली. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी मजबूत भारत-जपान संबंध महत्त्वाचे असण्यावर आम्ही सहमत झालो,’ असे ट्विट मोदींनी केले आहे.