मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मोदी ‘पाहुणे’
संरक्षण मंत्रालयावर झळकले पंतप्रधान मोदींचे मोठे चित्र
वृत्तसंस्था/ माले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. बेट राष्ट्र मालदीव त्यांच्या स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव साजरा करत आहे. याप्रसंगी, राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. या सोहळ्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंध पुन्हा मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मालदीवच्या जनतेला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी शुक्रवारपासून मालदीवमध्ये असून त्यांनी द्विपक्षीय बोलणीही केली आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक चर्चा झाली असून दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत झाले आहेत. मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि परस्पर संबंध मजबूत करणे या मुद्यावर चर्चा झाली.
मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांच्याशी खूप सकारात्मक आणि उपयुक्त बैठक झाल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. आमची चर्चा भारत-मालदीव मैत्रीच्या प्रमुख स्तंभांवर केंद्रित होती. दोन्ही देश पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, हवामान बदल, ऊर्जा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये जवळून सहकार्य करत आहेत. हे सहकार्य आपल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. येणाऱ्या काळात ही भागीदारी आणखी दृढ होण्याची आम्हाला आशा आहे, असे जयशंकर यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
एस जयशंकर यांचा ‘शुभ’संदेश
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मालदीवला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा संदेशही दिला आहे. मालदीवचे सरकार आणि जनतेचे त्यांच्या स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी समारंभाबद्दल अभिनंदन. आज मला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मालदीवची राजधानी माले येथे स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्याचा मान मिळाला. आम्ही भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी करत आहोत आणि हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी आमची भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 
पंतप्रधान मोदींचे दिमाखात आदरातिथ्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मालदीवच्या दौऱ्यावर दिमाखदार स्वागत झाले. ते विमानतळावर मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर ते भारतीय समुदायाच्या लोकांनाही भेटले. पंतप्रधानांच्या या भेटीवेळी मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावण्यात आला होता. हे छायाचित्र भारताचे मालदीवसोबतचे वाढती प्रादेशिक शक्ती आणि संरक्षण सहकार्य दर्शवते.