मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी दिला यशाचा मंत्र
पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर भर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्ल्लीत आयोजित करण्यात आलेली दोन दिवशीय बैठक रविवारी संपली. या बैठकीत अनेक राज्यांच्या योजनांवर चर्चा झाली. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी भारताला पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रयत्नांवर प्रामुख्याने भर दिला. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात दोन दिवस मुख्यमंत्री परिषदेची बैठक चालली. त्यात भाजपशासित राज्यांचे 13 मुख्यमंत्री आणि 15 उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री परिषदेला संबोधित केले. केंद्र आणि राज्य सरकारने लोककल्याणासाठी समन्वित प्रयत्न केल्यास सरकार विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी होईल, असे पंतप्रधान म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पनेसाठी वारसा जतन करणे आणि विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी करण्यात येत असलेले विविध प्रयत्न, विकास कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवणे आणि सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याबाबत पंतप्रधानांनी पाठपुरावा केला.
बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनी मार्गदर्शन केले. या बैठकांमधून आम्हाला तीन विशिष्ट उपलब्धी मिळतात. पहिले म्हणजे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासह आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या अफाट अनुभवाचा लाभ सहभागींना मिळतो. दुसरे, आम्हाला आमच्या अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची आणि काही नवीन माहिती आणि नवीन मूल्यांकन मिळविण्याची संधी मिळते. तिसरे, काहीतरी चांगले करण्याची आपली इच्छा प्रबळ होते, असे न•ा म्हणाले.
शिक्षण मंत्र्यांचेही मार्गदर्शन
बैठकीत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारांच्या भूमिकेवर चर्चा केली. अनेक राज्यांच्या निवडक योजनांचाही उल्लेख करण्यात आला. उत्तर प्रदेशची ग्रामीण सचिवालय योजना, सरकारी रिक्त पदांवर लवकर भरती करण्यासाठी आसाम सरकारची विशेष मोहीम, सौरऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी गुजरातचे प्रयत्न, त्रिपुराचा ‘अमर सरकार’ कार्यक्रम आणि बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी बिहार सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या काही विशेष प्रकल्पांवरही चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीनंतरची पहिलीच परिषद
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री परिषदेची बैठक झाली. याकडे भाजपचे आत्मपरीक्षण म्हणून पाहिले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेते या बैठकीत सहभागी झाले होते.