ट्रंप, हॅरिसना न भेटता दौरा समाप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले भारतात, उद्योगपतींशी आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी चर्चा ठरली महत्वाची
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला तीन दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून भारतात परतले असून, त्यांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा ठरला आहे. मात्र, या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि कमला हॅरिस यांची भेट घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आल्यानंतर मला भेटणार आहेत, असे प्रतिपादन ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पेन्सिलव्हानिया येथील प्रचार सभेत केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे, असे वृत्त पसरले होते. तथापि, अशी भेट ठरलीच नव्हती, असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे. हॅरिस यांचीही भेट त्यांनी या दौऱ्यात घेतली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अमेरिका दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम होते. त्यामुळे त्यांना अन्य कोणत्याही नेत्याची भेट घेता आली नाही. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी त्यांनी भारत-अमेरिका संबंध, तसेच क्वाडची पुढची दिशा यासंबंधी विस्तृत चर्चा केली. क्वाड परिषदेसमोर त्यांनी भाषणही केले. त्यांनी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरीकांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. तसेच अमेरिकेच्या प्रख्यात उद्योगपतींसमवेत आर्थिक चर्चा केली. भारतात आता उद्योग, व्यवसाय चालविण्यासाठी उत्कृष्ट वातावरण निर्माण झाले असून अमेरिकेतील उद्योगांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सेमीकंडक्टर उत्पादन, सौर ऊर्जा साधनांचे उत्पादन, जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन इत्यादी संबंधी चर्चा केली. भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात जागतिक उत्पादनाचे केंद्र बनण्याची क्षमता बाळगून आहे, ंहे त्यांनी या दौऱ्यात स्पष्ट केले आणि अधिकाधिक गुंतवणुकीचे आवाहन केले.
भेट न घेण्याचे कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याला प्रारंभ होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांची भलावण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असामान्य नेते आहेत, असे उद्गार त्यांनी काढले होते. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आमंत्रित केले होते आणि त्यांचे समर्थनही केले होते. तथापि, 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांचा पराभव होऊन जोसेफ बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष बनले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात न पडले योग्य मानले आहे, असे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेतील भारतीयांचा कल
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. ट्रंप आणि हॅरिस हे दोन्ही उमेदवार जीव तोडून प्रचार करीत आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे अनुमान आहे. 5 नोव्हेंबरला या देशात मतदान होणार आहे. पांरपरिकदृष्ट्या विचार करता अमेरिकेतील भारतीय वंशाचे नागरीक डेमॉक्रेटिक पक्षाला जवळचा पक्ष मानतात. तथापि, गेल्या 15 वर्षांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या नागरीकांचा कल रिपब्लिकन पक्षाकडेही वाढला आहे. यावेळी या मतदारांची भूमिका काय असेल, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
भारतावर काय परिणाम होणार...
अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीचा निर्णय कोणत्या उमेदवारच्या बाजूने लागणार आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार, यासंबंधातही चर्चा होत आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता, अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोणाचीही निवड झाली, तरी भारताच्या अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होणार नाही, असे अनेक तज्ञांचे मत आहे. भारताचे अमेरिकेशी संबंध हे नेत्यांवर अवलंबून नसून परिस्थितीआधारित आहेत, असेही कारण दिले जात आहे.