For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींना संघाच्या कानपिचक्या

06:13 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींना संघाच्या कानपिचक्या
Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही वेगळी आघाडी आहे. भाजपा मोठा पक्ष झाला आहे. संघाची आम्हाला गरज लागत नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणुकी दरम्यान इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले होते. तेव्हाच भाजप नेतृत्व आणि रा. स्व. संघ यांच्यात काही धुमसते आहे हे लक्षात आले होते. सोमवारी नागपुरात संघ शिक्षा वर्गाच्या समारोपात सरसंघचालकांनी नड्डा अथवा मोदी कुणाचेही नाव न घेता ज्या कानपिचक्या दिल्या आहेत, त्या पाहता भाजपची संख्या स्वबळावर बहुमत का करू शकली नाही हे सर्वांच्या लक्षात आले असेल. भागवतांनी आक्रमक पद्धतीने मोदी, शहा, नड्डा यांना डोस दिला आहे. यातून पुढे काय होणार हे बघावे लागेल. संघाचा भाजपासाठी हा पहिला धडा नाही. फिल गुडच्यावेळी भाजपा हिंदुत्ववादी अजेंडा राबवत नाही म्हणून संघाचा रोष होता. तेव्हा पराभव झाला. मोदींनी संघाचा 370 कलम रद्द, तीन तलाक, समान नागरी कायदा, राममंदिर असा कार्यक्रम राबवला. पण, अलीकडे ते संघ व संघ पदाधिकारी यांच्याशी नीट संबंध राखून नव्हते. राम मंदिर प्रतिष्ठापना समारोपापूर्वी मोदी व मोहन भागवत यांची भेट व चर्चा व्हावी असे नियोजन होते. पण, मोदींनी नकार दिला. मोदी नागपुरात मुक्कामाला राहिले पण, संघ मुख्यालयाकडे किंवा हेडगेवार समाधीस्थळाकडे फिरकले नाहीत याचा रागही संघाला, सरसंघचालकांना होता. संघ दसरा उत्सवात गेली काही वर्षे भाजपा सरकारचे कौतुक करत असे. पण, पंतप्रधान मोदींना अहंकाराची बाधा झाली आहे ते आणि शहा कुणालाही जुमानत नाहीत. भाजपाने महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल केला. प्रचारात पातळी सोडली, या सगळ्याचा संताप म्हणजे नागपुरातील मोहन भागवतांचे भाषण होते. खरेतर संघ दसरा मेळावा सोडला तर अधेमधे जाहीरपणे असे कोणते वक्तव्य करत नाही. पण, प्रथा बाजूला ठेवून सरसंघचालकांनी शेलक्या शब्दात मोदी, शहा व नड्डा यांना नाव न घेता नेमके औषध दिले आहे. सरसंघचालकांनी खडे बोल मतदान, मतमोजणी व शपथविधीनंतर सुनावले असले तरी त्यांच्याही मनात बराचकाळ ही तळमळ असावी. खरे तर भाजपा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी, संघाने शामाप्रसाद मुखर्जी जेव्हा जनसंघ काढतो म्हणाले तेव्हा त्यांना शक्ती दिली. दीनदयाळ उपाध्याय, जगन्नाथराव जोशी, लालकृष्ण अडवाणी, वसंतराव भागवत असे नेते पुरवले. तथापि संघाने भाजपचे अस्तित्व स्वतंत्र ठेवले. भाजपच्या निर्णयात ढवळाढवळ केली नाही. पण, आपली राजकीय आघाडी स्वत:ला स्वतंत्र शक्तिमान समजून संघाची गरज उरली नाही, अशी मुक्ताफळे उधळायला लागली आणि संघटनेपेक्षा, व्यक्तीमहात्म्य वाढू लागले. तेव्हा संघटन में शक्ती है, याची संबंधितांना प्रचिती देणे गरजेचे होते आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी ती दिली. भाजपची सत्ता असणे हे संघाला अपेक्षीत आहे. भाजपा सरकारने संघाचे वर्षानुवर्षे प्रलंबित 370 वे कलम रद्द, राममंदिर असे विषय सोडवले. याचा संघाला आनंद व अभिमान आहे पण, भाजपात कुणा प्रमुखाला अहंकाराचा वारा लागला तर ते संघाला मान्य होणार नाही. म्हणूनच भागवतांनी नागपुरात भाष्य करताना अहंकारी व्यक्ती सेवाभाव किंवा सेवक होऊ शकत नाही असे वर्मावर बोट ठेवले. मोदी स्वत:ला प्रधानमंत्री नव्हे तर आपण प्रधानसेवक आहोत असे सांगतात. त्यांचा हा संदर्भ होता. निवडणुका होतात, सत्ता येते जाते. निवडणुकीत एक सत्ताधारी होतो व दुसरा प्रतिपक्ष. लोकशाहीत प्रतिपक्ष म्हणजे शत्रू नव्हे देश व संसद ही चर्चेने सहमतीने चालवली पाहिजे, असेही भागवत यांनी म्हटले आणि निवडणूक काळात प्रचाराची भाषा, टीका यांची पातळी राखली जात नाही याचा संतापही बोलून दाखवला. राजकीय पक्षात शत्रुत्वाची भावना निर्माण होता कामा नये, अशी त्यामागची भूमिका आहे. संघाला शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात झालेला व्यवहारही आवडला नसावा. इतर राज्यात तुम्ही समाजवादी व भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना बरोबर घेता, त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी समर्थन करता मग हिंदुत्ववादी शिवसेनेने महाराष्ट्रात ठरले नसतानाही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले तर द्यायला काय हरकत होती असाही सूर संघ परिवारातून ऐकू येत होता. भागवतांच्या भाषणाला तो संदर्भही शक्य आहे. संघ मणिपूरमधील घटनांनीही व्यथित आहे. मणिपूरचा विषय तातडीने सोडवायला हवा होता. तो गंभीरपणे घेतला नाही असेही संघाचे म्हणणे आहे. भाजपात कुणालाही प्रवेश दिले जात होते. सरकारी यंत्रणांचाही कसाही वापर होत होता. आप सारख्या पक्षाचे नेते जेलमध्ये घातले हे काहीजणांना आवडले नव्हते. ओघानेच सारे साचलेले बाहेर आले व नाव न घेता मोदी व शहा, न•ा वगैरेंना योग्य त्या कानपिचक्या दिल्या आहेत. जे. पी. न•ा यांची भाजपा अध्यक्षपदाची मुदत संपलेली आहे. निवडणूक तोंडावर बदल नको म्हणून त्यांना मुदत वाढवून दिली होती. पण, आता अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आहे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून बहरलेले व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रात मंत्री म्हणून आणि नंतर पक्षसंघटनेत दिल्लीत त्यांनी कामगिरी केली आहे. नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते. आता तावडेंना संधी मिळाली तर राज्यात आणि देशात वेगळा मेसेज जाऊ शकतो. तावडे यांनी विविध राज्यात पक्षप्रभारी म्हणून चांगले काम केले आहे. त्यांना संधी मिळते का बघितले पाहिजे. मराठा चेहरा पुढे आला तर विधानसभा निवडणुकीला उपयोग होऊ शकतो. महाराष्ट्रातही संघटनेत बदल शक्य आहेत. सत्ता मिळवली पाहिजे, पण, सत्तेसाठी काहीही करायचे नाही हाच धडा भाजपकडून गिरवून घेतला जाईल असे दिसते. मोदी की गॅरंटी, मोदी सरकार, मोदी मोदींचे नारे, कमी होत आहेत व एनडीए सरकार वगैरे भाषा सुरू आहे. मोदी शहा यांना पुन्हा सत्ताप्राप्त झाली असली तरी दोन बाबुंच्या कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. चंद्राबाबू व नितीशकुमार कसलेले राजकारणी आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर सत्ता राखणे, चालवणे तितके सोपे नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी भाजपला मित्र आणि मित्राचा विश्वास संपादन करावा लागेल. वाजपेयी यांनी असे सरकार चालवले होते. मोदी काय करतात हे बघावे लागेल पण, संघचालकांच्या मनातील राग प्रगट झाला आहे. मोदी, शहा स्वभावात बदल करतात का बघावे लागेल. पण, येणारा काळ या दोघांना अनेक पातळीवर कठीण दिसतो आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.