मोदींचे आवाहन, श्रीलंकेकडून मच्छिमारांची मुक्तता
पंतप्रधान मोदींकडून अनुराधापुरामध्ये रेल्वेस्थानकाचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ अनुराधापुरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर श्रीलंकेने 14 भारतीय मच्छिमारांची रविवारी मुक्तता केली आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्याशी मच्छिमारांच्या मुक्ततेवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी हे तीन दिवसीय श्रीलंका दौरा पूर्ण करून रविवारी भारतात परतले आहेत.
तत्पूर्वी मोदींनी रविवारी बौद्ध तीर्थक्षेत्र अनुराधापुरामध्ये माहो ओमनथाई रेल्वेमार्गाचे उद्घाटन आणि सिग्नल सिस्टीमच्या कार्याचा शुभारंभ केला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासोबत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
श्रीलंकेच्या माहो जिल्ह्यापासून ओमनथाई जिल्ह्यादरम्यान हा रेल्वे मार्ग नॉर्दर्न रेल्वेलाइनचा 128 किलोमीटर लांबीचा हिस्सा आहे. श्रीलंकेच्या कुरुनेगला, अनुराधापुरा आणि ववुनिया जिल्ह्यांमधून हा रेल्वेमार्ग जातो. श्रीलंका सरकारने या रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण आणि सुधारासाठी अनेक प्रकल्प सुरू केले ओहत. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आयरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या रेल्वेमार्गाच्या विकासाचे काम करत आहे. या प्रकल्पासाठी भारताने 2720 कोटी रुपयांचे कर्ज श्ा़dरीलंकेला दिले आहे.
पंतप्रधान मोदींनी रविवारी अनुराधापुरा येथील जयश्री महाबोधि मंदिरालाही भेट दिली आहे. मोदींनी मंदिरातील बौद् भिक्षूंशी यावेळी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी मंदिराच्या प्रमुख बौद्ध भिक्षूला भेटवस्तू प्रदान केली.
मच्छिमारांच्या मुक्ततेवर चर्चा
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली होती. यादरम्यान मोदींनी भारतीय मच्छिमारांची मुक्तता आणि तमिळ समुदायाच्या अधिकारांवर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी दिसानायके यांना भारतीय मच्छिमारांची त्वरित मुक्तता करणे आणि त्यांच्या नौका परत करण्याचे आवाहन केले होते. याप्रकरणी मानवतेसह निर्णय घेण्यात यावेत असे मोदींनी म्हटले हेते. श्रीलंका सरकार तमिळांच्या अपेक्षा पूर्ण करेल आणि श्रीलंकेच्या घटनेच्या अंतर्गत मिळालेल्या पूर्ण अधिकारांना लागू करेल असा विश्वास असल्याचे मोदींनी म्हटले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेत तमिळ समुदायाशी संवाद साधला होता.