कोलकात्यात आधुनिक सुसज्ज हॉकी स्टेडियम
वृत्तसंस्था / कोलकाता
भारतीय हॉकीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येथे होणाऱ्या आगामी 126 व्या बेग्टन चषक हॉकी स्पर्धेसाठी पश्चिम बंगालच्या शासनाने सुसज्ज आणि आधुनिक अद्यावत हॉकी स्टेडियमची उभारणी केली आहे. सॉल्टलेक क्रीडा संकुलाच्या प्रांगणात या नव्या विवेकानंद युवा भारती हॉकी स्टेडियमचे उद्घाटन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय हॉकी क्षेत्रातील माजी ऑलिम्पिक हॉकीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतामध्ये बेग्टन चषक हॉकी स्पर्धा 1895 पासून नियमीतपणे खेळविली जात आहे. जागतिक हॉकी क्षेत्रातील ही सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ झाला असून 16 नोव्हेंबरला अंतिम सामना या नव्या हॉकी स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे. या नव्या हॉकी स्टेडियमची क्षमता 22 हजार प्रेक्षकांची आहे. या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. भारतीय हॉकी क्षेत्राला शुक्रवारी 100 वर्षे पूर्ण झाली असल्याने शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी हॉकी बंगालने पुरूष आणि महिलांच्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा भरविली आहे.