For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आधुनिक सावित्री : वसा जोपासण्याची गरज

10:34 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आधुनिक सावित्री   वसा जोपासण्याची गरज
Advertisement

बेळगाव : भारतातील सर्व सण, समारंभ हे सत्कार्याचे प्रतीकच असतात,तसेच प्रत्येक सणाच्या विधीमागे शास्त्रीय कारणही असतं. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला येणारं वटसावित्री व्रत.....

Advertisement

या दिवशी सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात... तसेच अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात.... वडाच्या झाडाची पूजा करण्याचे कारण असे आहे, की वडाचे झाड हे हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असे मानले जाते. कारण यामध्ये त्रिदेवांचा (ब्रम्हा विष्णू महेश) वास असतो, अशी धारणा आहे. शास्त्रीय कारण असे की, वडाच्या झाडामध्ये या दिवसात एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव होत असतो. स्त्रिया जेव्हा पूजा करताना वडाच्या झाडाला स्पर्श करतात तेव्हा तो स्त्राव स्त्रियांच्या हाताला लागतो, आयुर्वेदीयदृष्टीने हा स्त्राव स्त्रियांच्या आरोग्यासाठी हितकारक असा मानला जातो. अशी एक ना अनेक कारणे आहेत.

भारतीय संस्कृतीमध्ये सजीव-निर्जीव वस्तूंची, त्यांनी दिलेल्या सेवेची परतफेड करण्याची पद्धत आहे. भारतीय संस्कृती ही खरोखरच खूप संस्कारक्षम अशी आहे. झाडे, प्राणीमात्र यांचीही पूजा यामध्ये केली जाते. या माध्यमातून या संस्कृतीद्वारे आपण त्या त्या गोष्टीला धन्यवाद करत असतो. या चराचरातील प्रत्येक गोष्ट पूजनीय आहे व मानवास उपयुक्त आहे, याची जाणीव ठेवली जाते. परंतु आजच्या आधुनिक जगात आपल्याला या व्रताबरोबरच आणखी एक व्रत करणे आवश्यक आहे, जे आहे ‘झाडे लावा व झाडे जगवा’ हे व्रत किंवा हा वसा. झाडे लावण्यासाठी तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी आज प्रत्येकालाच करणे आवश्यक आहे. कारण झाडे आहेत तरच जीवन आहे, हे आपण सर्वजण जाणून आहोत.

Advertisement

उदाहरणादाखल, जर आज आपण वडाचेच झाड लावले नाही किंवा त्याचे संवर्धन केले नाही तर आपण पुढच्या वषी त्याची पूजा कुठून करणार? निदान आपल्या व्रतवैकल्यांसाठी तरी आपल्याला या गोष्टी करणे आवश्यक आहे..... आपण खूपदा वृक्षारोपण करतो परंतु त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेत नाही, ती घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रदूषण रोखणे. प्रदूषण वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीलाच आळा बसविणे आवश्यक आहे. निदान प्रत्येकाने जरी स्वत:पुरती ही जबाबदारी स्वीकारली तरी संपूर्ण सृष्टीत आपण एक चांगला नैसर्गिक व सेंद्रिय बदल घडवून आणू शकतो. प्लास्टिकचा मर्यादित वापर, अनावश्यक रासायनिक, कीटकनाशकांची फवारणी रोखणे, झाडाभोवती झाडाला न आवडणाऱ्या गोष्टींचा प्रादुर्भाव रोखणे अशा एक ना अनेक गोष्टी आपण वृक्ष संवर्धनासाठी करूच शकतो.....

आजच्या पवित्र अशा वटसावित्रीचे निमित्त साधून जरी आपण आपल्या सोयीनुसार एखादे झाड जरी लावले आणि वर्षामध्ये आपण निदान पाच ते दहा झाडे लावू व ती वाढवू, असा संकल्प जरी प्रत्येकाने केला तरी आपण सजीवसृष्टी कार्यक्रमात सकारात्मक कार्य करू शकतो. आता यामागे तर्क संगती अशी लावूया की, जर झाडे लावली, त्यांचे संवर्धन केले तर त्यांचा सर्वात मोठा फायदा हा मानव जातीलाच होणार आहे. म्हणजे बाकीच्या फायद्यासोबत सर्वात मोठा फायदा म्हणजे प्राणवायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. परिणामी आम्ही ज्यांच्यासाठी हे व्रत करतो (पती-कुटुंब) तर त्यांनाच उपयोगी पडेल व व्रतही सफल होईल. आता नुसती पूजा करून देवाकडे साकडे घालायचे की, त्यासोबतच स्वत:ही या कार्यात सक्रिय सहभाग घ्यायचा, याचा निर्णय व कार्य आपल्या हाती आहे. म्हणूनच आज वृक्षरूपी सत्यवानाला गरज आहे ती त्याचे प्राण वाचविणाऱ्या खऱ्याखुऱ्या सावित्रीची.

Advertisement
Tags :

.