एका देशात दरवर्षी युद्धाचे मॉक ड्रिल
प्रत्येक घरानजीक बंकरची निर्मिती
भारत सरकारने अलिकडेच देशभरात नागरी सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करविले होते. हे मॉक ड्रिल युद्धाच्या स्थितीत स्वत:चा बचाव कसा करावा याचे धडे देणारे असते. परंतु एका देशात दरवर्षी युद्धविषययक मॉक ड्रिल होत असते आणि तेथे प्रत्येक घरानजीक बंकर निर्माण केलेला असतो.
स्वीत्झर्लंड मध्य युरोपमधील एक सुंदर अन् अत्यंत विकसित देश आहे. हा देश नैसर्गिक सौंदर्य, घड्याळ, चॉकलेट, तटस्थ विदेश धोरण आणि बँकिंग सिस्टीममुळे जगभरात वेगळे स्थान बाळगून आहे. या देशात दरवर्षी मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक दाखल होत असतात. हा देश अन्य देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये स्वत:चे नाक खूपसत नाही. संघर्षापासून कित्येक कोसो दूर राहिलेल्या या देशात तरीही प्रत्येक घरात बंकर दिसून येतो.
शीतयुद्धादरम्यान निर्मिती
शीतयुद्धानंतर युरोपीय देशांमध्ये कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंकर्सची निर्मिती करविण्यात आली होती. यात स्वीत्झर्लंड आघाडीवर होता. युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेला संघर्ष पाहता स्वीत्झर्लंडमध्ये नवे बंकर निर्माण केले जात आहेत. तसेच जुन्या बंकर्सची स्थिती सुधारली जातेय. तिसरे महायुद्ध झाले तर स्वत:च्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्वीत्झर्लंड सरकार हे पाऊल उचलत आहे.
दरवर्षी आयोजन
स्वीत्झर्लंडचे सैन्य दरवर्षी युद्धाभ्यास करते आणि नागरिकांना युद्धाच्या स्थितीत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षण देत राहते. स्वीत्झर्लंडसोबत युरोपमधील अनेक देश बंकर निर्माण करण्यासह नागरिकांना युद्धाप्रसंगी जीव कसा वाचवावा याची माहिती देत असतात.