मुगळखोड येथील मोबाईल चोरीचा दोन दिवसांत छडा
तीन लाखांचे सात मोबाईल संच हस्तगत
बेळगाव : मुगळखोड (ता. रायबाग) येथील एका मोबाईल दुकानावरील पत्र्याचे नटबोल्ट काढून तीन लाखांचे मोबाईल पळविल्याप्रकरणी हारुगेरी येथील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हारुगेरी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून चोरीचे सात मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. हणमंत लक्काप्पा कुरणी, शांतीसागर ऊर्फ शांतू आण्णाप्पा कुरली, दोघेही राहणार हारुगेरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. 21 जून 2024 रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. मुगळखोड येथील मल्लिकार्जुन कम्युनिकेशन या मोबाईल दुकानावरील पत्र्याचे नटबोल्ट काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता.
2 लाख 85 हजार 346 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे सात मोबाईल संच पळविण्यात आले होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी., उपनिरीक्षक गिरीमल्लाप्पा उप्पार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीच्या घटनेनंतर दोन दिवसांत दोघा जणांना अटक करून सात मोबाईल जप्त केले आहेत.मोबाईल दुकानात चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हणमंत व शांतू या दोघा जणांनी हारुगेरी येथील कॅनरा बँक फोडण्याचाही यापूर्वी प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरीचे मोबाईल जप्त करून या जोडगोळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.