मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता
सरकारने मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केल्याचा होणार फायदा : कॅमेरा लेन्सच्या भागांवरही कमी कर
नवी दिल्ली
अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर केंद्र सरकारने मोबाईल स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क 15 टक्केवरून 10 टक्केपर्यंत कमी केले आहे. यामुळे मोबाईल स्वस्त होऊ शकतो. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बॅटरी कव्हर, मुख्य कॅमेरा लेन्स, बॅक कव्हर, प्लास्टिक आणि धातूच्या इतर यांत्रिक वस्तू, जीएसएम अँटेना आणि इतर भागांवर आयात शुल्क 10 टक्के करण्यात आले आहे.
अलीकडेच मोबाइल कंपन्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी 12 स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. कंपन्यांनी सांगितले की, चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांना उत्पादन क्षेत्रात स्पर्धा करायची असेल तर खर्च कमी करावा लागेल. चीन, व्हिएतनाम सारख्या देशांपेक्षा भारतात जास्त कर इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीइए) च्या मते, कॅमेरा मॉड्यूल्स आणि चार्जर यांसारख्या मोबाईल फोनच्या आवश्यक घटकांवर आयात शुल्क 2.5 टक्के ते 20टक्के पर्यंत आहे.
हा कर चीन आणि व्हिएतनाम सारख्या आघाडीच्या मोबाईल उत्पादक देशांपेक्षा खूप जास्त आहे. आयसीइएने म्हटले आहे की जोपर्यंत हे कर कमी केले जात नाहीत तोपर्यंत भारताची मोबाइल निर्यात वाढ मंद राहू शकते. स्मार्टफोनच्या किमती कमी होतील.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार, भारतात विकले जाणारे 98 टक्के स्मार्टफोन हे देशातच बनवले जातात. उत्पादन भागांवरील आयात शुल्क कमी झाल्याचा फायदा मोबाईल फोन क्षेत्राला होईल. त्यामुळे भारतातील मोबाईल फोनच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे.
शुल्क कमी केल्यामुळे निर्यात वाढेल
टॅक्स कन्सल्टन्सी फर्म मूर सिंघीचे संचालक रजत मोहन म्हणाले की, मोबाईल फोन पार्ट्सच्या आयातीवरील शुल्क कपातीमुळे मोठ्या जागतिक उत्पादकांना भारतात मोठ्या प्रमाणात मोबाईल असेंब्ली लाइन उभारण्यास मदत होईल. त्यामुळे मोबाईल फोनची निर्यात वाढेल.
भारतातील मोबाईल निर्यात दुपटीने वाढली
2022 मध्ये भारतीय स्मार्टफोनची निर्यात 7.2 अब्ज डॉलर (सुमारे 60 हजार कोटी) होती, जी 2023 मध्ये 13.9 अब्ज डॉलर (1.1 लाख कोटी) पर्यंत वाढेल. स्मार्टफोनची निर्यात 15 अब्ज डॉलर (सुमारे 1.2 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.