राज्योत्सव मिरवणुकीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ
शंभरहून अधिक जणांना फटका, तपासाचे आव्हान : 35 जणांच्या तक्रारी नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्योत्सवाच्या निमित्ताने शनिवारी रात्री उशिरापर्यंत राणी चन्नम्मा सर्कल परिसरात धिंगाणा सुरूच होता. गर्दीचा फायदा घेत पाकिटमार व मोबाईल चोरांचाही सुळसुळाट वाढला होता. रात्री 8 वाजेपर्यंत शंभरहून अधिक जणांचे मोबाईल चोरी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतरही तक्रारी घेऊन पोलीस स्थानकाकडे येणाऱ्यांची संख्या वाढतच होती.
गेल्यावर्षी 150 हून अधिक मोबाईल चोरी झाले होते. राज्योत्सवात मोबाईल चोरी करण्यासाठी हावेरी, गदगसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील गुन्हेगार बेळगावला येतात. पोलिसांनी वारंवार खबरदारीचे आवाहन करूनही डीजेच्या तालावर नाचण्याच्या धुंदीत आपला मोबाईल कोणत्या खिशात आहे, याचाच विसर पडलेला असतो. नेमका याच परिस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत असतात. मिरवणूक बंदोबस्तासाठी अडीच हजारहून अधिक अधिकारी व पोलीस जुंपण्यात आले आहेत. तरीही पाकिटमारी व मोबाईल चोरीच्या घटना सुरूच होत्या. एका खडेबाजार पोलीस स्थानकाकडे 80 हून अधिक तरुणांनी आपले मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी केल्या आहेत. रात्री 8 वाजेपर्यंत 35 जणांच्या तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या होत्या.
मोबाईल चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या तरुणांकडे आधारकार्ड, आयएमईआय क्रमांक आदी पूरक माहिती व कागदपत्रे नसल्यामुळे रविवारी सकाळी या, असे सांगत पोलीस त्यांना परत पाठवत होते. या सर्व घटना राणी चन्नम्मा चौकपासून काकतीवेसपर्यंत घडल्या आहेत. बेळगाव शहरातील तरुणांबरोबरच राज्योत्सवासाठी परगावाहून आलेल्या तरुणांचे मोबाईल चोरण्यात आले.
चन्नम्मा चौकपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या परिसरात 20 हून अधिक जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. यापैकी अनेकांनी मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. सीईआयआर व केएसपी पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. गेल्यावर्षी चोरीस गेलेल्या दीडशेपैकी निम्म्याहून अधिक मोबाईलचा खडेबाजार पोलिसांनी वर्षभरात तपास लावून संबंधितांना परत केले आहेत. बेळगावात चोरलेल्या मोबाईलची राजस्थान, हरियाणा, मुंबईसह वेगवेगळ्या राज्यातील शहरांमध्ये विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.