मनसेची उद्या पुण्यात आत्मचिंतन बैठक
पुणे
विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुऊवारी) पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे.
या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. मात्र एकही जागा मनसेला मिळाली नाही. निवडणुकीत पक्षाची वाताहात झाली असून , कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पुण्यात बैठक बोलवण्यात आली आहे. पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या पराभवाची कारणे लक्षात घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मचिंतन बैठकीच्या निमित्ताने सर्व पराभूत उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्या पाठोपाठ आता पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील मनसेचे पराभूत उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार असून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या पुढील काळात पक्षाची भूमिका काय असावी, या बाबतही चर्चा होणार आहे. शहर पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले.
लोकसभेला भाजपला जाहीर पाठींबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे केले होते. पुणे शहरातील कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी दोन वेळा जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा समाना करावा लागला आहे. काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत.
पुढील काही महिन्यात राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्यात सत्ताधारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर मनसेला पक्ष पातळीवर काही कठोर भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. संघटनात्मक बदल हे पक्षात करावे लागणार असून पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिस्त देखील लावावी लागणार आहे.