सावगाव तलावाची एमएलआयआरसीकडून स्वच्छता
बेळगाव : पर्यावरण संरक्षण करून जलप्रदूषण रोखण्याच्या हेतूने मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरने सावगाव येथील तलावाची स्वच्छता केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सावगाव तलावामध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती, सार्वजनिक व एमएलआयआरसीच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. परिणामी तलाव परिसरात निर्माल्य टाकण्यात आले होते. इन्फंट्रीच्या जवानांनी दि. 8 रोजी स्वच्छता अभियान राबवून सर्व निर्माल्य बाजूला काढले.सावगावमधील तलावात ग्रामस्थांसह गणेशपूर, बेनकनहळ्ळी, पाईपलाईन, सरस्वतीनगर, अंगडी कॉलेज परिसर, मंडोळी, नानावाडी, हंगरगे, बोकमूर या गावातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
यामुळे धरणातील पाणी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले होते. निर्माल्य व केरकचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू नये व पाणी दूषित होऊ नये यासाठी एमएलआयआरसीच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. एमएलआयआरसीच्या 150 हून अधिक जवानांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेत ग्राम पंचायतीने आणि स्थानिक नागरिक व तरुणांनी सहभाग घेतला. एमएलआयआरसीचे ब्र्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅ. जेनिश के., सब मेजर संदीप खोत व त्यांचे सहकारी, त्याचबरोबर ग्राम पंचायतीचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, पंचायत सदस्य, नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी ग्राम पंचायतीच्यावतीने सर्वांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली.