ई-आस्थी विभागीय कार्यालयाला आमदारांची भेट
आमदार राजू सेठ यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम : कार्यालयाबाबत नाराजी
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील मिळकतींची ई-आस्थी प्रणालीअंतर्गत नोंदणी करून घेताना जर अधिकाऱ्यासमोर एखादा एजंट दिसून आला तर त्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाईल, असा सज्जड दम आमदार राजू सेठ यांनी दिला आहे. अशोकनगर येथे इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन केल्यानंतर तेथील ई-आस्थी विभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली व तेथील ए व बी खात्याच्या वितरणामध्ये होणारा भ्रष्टाचार व फोफावलेले एजंटराज याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
या ठिकाणी आपले काम वेळेवर होत नसून चालढकल केली जाते. एजंटांकडून काम करून घेतले तर लवकर वर्णी लागते. अन्यथा, सातत्याने हेलपाटे घालावे लागतात, अशा तक्रारी नागरिकांनी आमदारांच्या समोर मांडल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त बी. शुभा यासुद्धा होत्या. आमदार राजू सेठ यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व येथील एजंटराज मोडीत निघाले पाहिजे, अशी सूचना आयुक्तांना केली. कोणत्याही परिस्थितीत जर या कार्यालयामध्ये एजंट आढळले तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असा दम भरला. या कामाचे कंत्राट ज्या कंपनीने घेतले त्याचे संचालक कार्यालयात उपस्थित नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे थांबणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी थेट कार्यालयीन अधिकाऱ्यांकडेच नोंदणी करावी व कोणत्याही परिस्थितीत एजंटांना हाताशी धरून काम करून घेऊ नये, असे आवाहन केले.
ई-खाता नोंदणी अर्जासाठी फक्त 25 रुपये शुल्क आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अधिक शुल्क देऊ नये. निष्कारण एजंटांना पैसे देऊन आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी रेश्मा तालिकोटी, नगरसेवक मुजम्मिल डोनी, नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते.