For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार वीरेंद्र यांना अटक : छाप्यात ईडीच्या हाती मोठे घबाड

06:38 AM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार वीरेंद्र यांना अटक   छाप्यात ईडीच्या हाती मोठे घबाड
Advertisement

बेकायदा ऑनलाईन, ऑफलाईन बेटींग प्रकरणी कारवाई : दोन दिवस मुंबई, गोव्यासह राज्यात 31 ठिकाणी धाडी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेकायदा ऑनलाईन व ऑफलाईन बेटींग प्रकरणी चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार के सी. वीरेंद्र उर्फ वीरेंद्र पप्पी यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटक केली आहे. सिक्कीमच्यी गंगटोक येथे शनिवारी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीने मागील दोन दिवस 31 ठिकाणी टाकलेल्या धाडीत 1 कोटींच्या विदेशी चलनासह 12 कोटींची रोकड व इतर मालमत्ता जप्त केली.

Advertisement

आमदार वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणात बेंगळूरमधील ईडीच्या पथकांनी शुक्रवार आणि शनिवारी गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बेंगळूर शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई, गोवा (पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राईड, ओशन 7 कॅसिनो, बिग डॅडी कॅसिनो) यासह देशातील 31 ठिकाणी छापे टाकून झडती घेतली. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चाललेल्या या कारवाईत 1 कोटी विदेशी चलनासह 12 कोटी रु. रोख, 6 कोटी रु. किमतीचे सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीच्या वस्तू, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तसेच चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. शिवाय 17 बँक खाते आणि 2 बँकांमधील लॉकर गोठविण्यात आले आहेत. एमजीएम कॅसिनो, मेट्रोपॉलिटीन कॅसिनो, बेल्लाजीयो कॅसिनो, मरीना कॅसिनो, कॅसिनो ज्युवेल अशा आंतरराष्ट्रीय कॅसिनोंची सदस्यत्व असणारे कार्ड, विविध बँकांचे क्रेडिट-डेबिट कार्ड, अनेक अलिशान हॉटेल्सचे सदस्यता कार्डही वीरेंद्र यांच्याजवळ आढळले आहे. सदर घबाड कोठे आणि कुणाकडे सापडले, याविषयी उघड केलेले नाही. अधिक तपासानंतर याविषयी विस्तृत पत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सिक्कीमच्या गंगटोक येथे आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी वीरेंद्र यांना गंगटोक जिल्हा मॅजिस्टेटसमोर हजर करण्यात आले. त्यांना बेंगळूरमधील न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळविला. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना बेंगळूरला आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. आमदार वीरेंद्र हे आपल्या साथीदारांसमवेत कॅसिनो लिजवर घेण्याच्या वाटाघाटीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सिक्कीमला गेले होते, असे सांगितले जात आहे.

शुक्रवारी चित्रदुर्ग व बेंगळूरमध्ये आमदार वीरेंद्र, त्यांचे बंधू के. सी. नागराज, पुतण्या पृथ्वी एन. राज यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या पथकांनी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. वीरेंद्र यांचा आणखी एक भाऊ के. सी. तिप्पेस्वामी व त्यांचे इतर साथीदार दुबईतून ऑनलाईन गेमिंग व्यवहार हाताळत होते, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसच्या आमदारावर सट्टेबाजाचा आरोप झाल्याने पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाच्या वरिष्ठाकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाईल, याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.