आ. सुहास बाबर यांनी पहिल्याच भाषणात विधानसभा गाजवली
विटा :
आमच्यावर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी एकदा खानापूर विधानसभा मतदारसंघात येऊन पहावे, असे आव्हान विरोधकांना देताना या सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची कामे उभा राहिली आहेत. त्यामुळेच लोकांनी सुहास बाबरला ७८ हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. माझे वडील गेल्यानंतरच्या दहा महिन्यात माझ्या मतदारसंघाला आमदार नाही, हे या सरकारने कधीच जाणवू दिले नाही, असे मत आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केले.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास बाबर यांनी पहिल्याच भाषणात वक्तृत्त्वाची चुणूक दाखवली. साहित्यीक ग. दी. माडगुळकर यांच्या माणदेशावरील कवीतेचा दाखला देत दुष्काळी भागाचा आणि श्री गुरूदेव दत्त यांचा उल्लेख करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या कामाचे कौतुक करताना ब्रम्हा, विष्णु, आणि महेश्वर या त्रिमुर्तीचे उदाहरण दिले. त्याबरोबरच मतदारसंघाचे वैशिष्ट्य सांगताना ग. दि. माडगुळकर यांच्या कवितेचा दाखला दिला. राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकारचा पुढील काळातील प्लॅन असतो. विधिमंडळात पहिल्यांदा बोलताना मनातल्या भावना ओठावर आल्याच पाहिजेत, असे आमदार बाबर म्हणाले.
आमचा मतदार संघ म्हणजे माणदेशातला कायमचा दुष्काळी पट्टा. या दुष्काळी भागासाठी माझ्या वडिलांनी टेंभू उपसा सिंचन ही आशिया खंडातील सर्वात मोठी योजना मांडली. त्याकाळी अनुशेषाचा मुद्दा समोर होता. २००२ साली माझे वडील सभागृहात पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची व्यथा मांडत होते आणि त्याचवेळी अख्या विदर्भावर कसा अन्याय झाला आहे, हे विरोधी पक्ष नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नावाचे तरुण आमदार पोटतिडकने सांगत होते. तेच देवेंद्र फडणवीस २०१४ साली मुख्यमंत्री झाले आणि माझे वडील अनिलभाऊ बाबर आमदार म्हणून सभागृहात आले. टेंभू योजना होईल का नाही?, अशी आमच्या मनात साशंकता निर्माण झाली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे वडील जेंव्हा गेले, त्यावेळी त्यांनी सर्व गोष्टी जुगारून पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या मतदारसंघाला पाणी देण्याची भूमिका ठेवली. आज मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला आहे, अशी आठवण आमदार बाबर यांनी सभागृहात सांगितली.
शिंदे साहेबांनी पालकत्व घेतले
वर्षभरापूर्वी माझे वडील गेले. आणि त्यानंतरच्या दहा महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाला आमदार नाही, असे कधीच जाणवू दिले नाही. माझ्या वडिलांच्या आयुष्यातील अखेरचे जे टेंभू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण करण्याचे जे स्वप्न होते. ते देखिल त्यांनी पुर्ण केले. आज लाडकी बहीण योजना असो किंवा शेतीतील उत्क्रांती असो, प्रचंड काम आमच्या मतदारसंघात झाले आहे..